

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात भीक मागण्याचा व्यवसाय करणार्या एका रॅकेटने अहमदनगर जिल्ह्यातील एका दाम्पत्याकडून अवघ्या दोन हजारांत चिमुकली विकत घेतली. विशेष म्हणजे हा व्यवहार समाजातील पंचांसमक्ष करण्यात आला. यासाठी पंचांनीही मध्यस्थी म्हणून पैसे घेतले. या मुलीसंदर्भात दोन महिन्यांनंतर शहरातील एका वकिलास माहिती मिळाली. त्याने मुलीचा आणि रॅकेटचा माग काढत थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी, येरवडा पोलिसांनी मुलीचे आई-वडील, दलाल आणि पंचांसह तब्बल 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अॅड. शुभम शंकर लोखंडे (वय 27, रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. मुलीचे आई-वडील, दलाल लक्ष्मण निंबाळकर, लक्ष्मी जाधव तिचा पती अनिल जाधव याच्यासह दहा पंचांवर (सर्व रा. येरवडा, मूळ अहमदनगर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते वकिलीबरोबरच समाजसेवा करतात.
त्यांना एका परिचिताने माहिती दिली की दोन महिन्यांपासून विमाननगर, येरवडा, कल्याणीनगर परिसरात लक्ष्मी जाधव नावाची महिला एक चार ते पाच वर्षांच्या मुलीला भीक मागायला लावते. भीकेतून मिळालेले पैसे आणि अन्न सर्व स्वत:कडे काढून घेते. भीक न मिळाल्यास मुलीला मारहाण केली जाते. लक्ष्मण निंबाळकर हादेखील त्यांच्या सोबत असतो. त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता, लक्ष्मी आणि तिचा पती अनिल हे रामवाडी येथील पालावर राहत असल्याची माहिती मिळाली.
या दोघांनी अहमदनगर कर्जत येथील एका दाम्पत्याकडून ही मुलगी दोन महिन्यांपूर्वी दोन हजारांत विकत घेतली होती. या पीडित मुलीला पाच बहिणी होत्या. त्यांच्याकडे तिचे वडील लक्ष देत नव्हते. यामुळे त्यांना विश्वासात घेऊन लक्ष्मी पवार, तिचा पती अनिल पवार आणि मित्र लक्ष्मण निंबाळकर यांनी 'मुलगी आम्हाला दे, त्या बदल्यात पैसे देतो,' असे सांगितले. त्याप्रमाणे जात पंचायतीतील दहा पंचांसमक्ष व्यवहार ठरला. तर, जातपंचायतीने कोणी विरोध केला, पोलिसात गेला तर आम्ही जातीबाहेर काढू, असा निर्णय दिला. यामुळे दहशतीने सर्व शांत बसले होते. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.
हेही वाचा