12 वर्षांनंतरही आमच्या जखमा ओल्याच..! मावळ तालुक्यात तीव्र पडसाद

12 वर्षांनंतरही आमच्या जखमा ओल्याच..! मावळ तालुक्यात तीव्र पडसाद
Published on
Updated on

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठविल्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात तीव्र पडसाद उमटत असताना या प्रकल्पामुळे घडलेल्या मावळ गोळीबार प्रकरणातील जखमींनी मात्र आम्ही 12 जण 12 वर्षे झालंय यातना भोगतोय, आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल केला आहे. एवढेच नाही, तर आमच्या जखमा ओल्याच आहेत, अशी खंत त्यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बऊर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागून मावळ गोळीबार प्रकरण घडले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. तसेच योगेश तुपे, शिवाजी वर्वे, अमित दळवी, विशाल राऊत, अजित चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, मारुती खिरीड, काळूराम राऊत, दत्तात्रय पवार व सुरेखा कुडे हे 12 जण पोलिसांच्या गोळीने जखमी झाले होते.

राज्य सरकारने आम्हाला विश्वासात न घेता थेट या प्रकल्पावरील स्थगिती उठवली, 12 वर्षांनंतर सरकारने स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला, पण 12 वर्षे झाली, आम्हाला न्याय मात्र सरकार देऊ शकले नाही. आम्ही गेली 12 वर्षे यातना भोगतोय, आम्हाला न्याय तरी कधी मिळणार, असा सवाल संबंधित जखमींनी या वेळी केला.

आजही बसतोय धसका

या हिंसक आंदोलनात जखमी झाल्यावर दुखण्यातून बाहेर येईपर्यंत व त्यानंतर पोलिस कारवाई, तुरुंगाची हवा व यामुळे कुटुंबाला सहन करावा लागलेला त्रास याची आठवण झाली तरी आजही धसका बसतोय. याशिवाय अशा गंभीर अवस्थेत आधाराची गरज असताना आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. नेत्यांनी नोकरी मिळवून देऊ, अशी आश्वासने दिली, परंतु गेली 12 वर्षे आम्ही नोकरी मिळण्याची वाट पाहतोय अशा भावना या जखमींनी या वेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news