

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून मतांची जुळवाजुळव करण्याचा सपाटा सर्वच राजकीय पक्षांनी लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी एसटीला पहिली पसंती दिली आहे.
सध्याच्या गणेशोत्सवासाठी एसटीच्या तब्बल तीन हजार ८३५ गाड्या बुक झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ९५३ गाड्या या ग्रुप बुकिंगच्या आहेत. या ग्रुप बुकिंगमधील बहुसंख्य गाड्या या राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या, मंडळाच्या नावावर बुक केल्या आहेत.
• चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपातर्फे एक, तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यातर्फे एक, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यातर्फे प्रत्येकी दोन मोदी एक्स्प्रेस अशा चार रेल्वेगाड्यांचे पूर्ण नियोजन झाले. अजून दोन गाड्या प्रस्तावित आहेत. शुक्रवारी, १५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मुंबई भाजपातर्फे २५६ एसटींची मोफत सेवा, तर काही नगरसेवकांतर्फे आपापल्या विभागातून खासगी बस चालविण्यात येणार आहेत.
• अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे ५१ बस सोडण्यात येत असून वांद्रे पश्चिम येथून ३१ एसटी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावांपर्यंत ३३८ हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
• यंदाच्या गणेशोत्सवासाठी ठाण्यातून सर्वाधिक १ हजार ५८७ एसटीचे ग्रुप बुकिंग झाले आहे. मुंबईतून एक हजार २८७, तर ठाण्यातून एक हजार ९५९ एसटी गणेशोत्सवाकरिता रवाना होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून तब्बल ९०० एसटी आरक्षित झाल्याचे समजते.