पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी, या उद्देशाने होणार्या आविष्कार स्पर्धेचा बिगुल वाजला असून, पहिल्या टप्प्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये आविष्कार स्पर्धा 25 सप्टेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश विद्यापीठांतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे (आयक्यूएसी) संचालक डॉ. संजय ढोले यांनी दिले आहेत.
सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू झालेल्या आविष्कार स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विद्यापीठाने या स्पर्धेत अनेकदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्स, ग्रीनकल्चर अँड अॅनिमल हसबंड्री, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी या विभागातील संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना सादर करायचे आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्या महाविद्यालय व संशोधन संस्थेला दोन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना एका मिनिटाची व्हिडिओ क्लिप तयार करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर आणि शंभर शब्दांत प्रकल्पाची माहिती द्यावी लागणार आहे. महाविद्यालयाने प्रत्येक शाखेतून दोन संघांची निवड करून, त्यांची यादी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाकडे सादर करणे आवश्यक आहे.
या प्रकल्पांचे परीक्षण करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाकडून विभागीयस्तरावरील आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 16 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत होईल. या स्पर्धेतून शाखानिहाय अंतिम प्रकल्पांची निवड करून, त्यांचे सादरीकरण मुख्य आविष्कार स्पर्धेत करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. ढोले यांनी केले आहे.
हेही वाचा