

बंगळूर : हेलिकॉप्टर उतरवायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम सुसज्ज हेलिपॅड क्रमप्राप्त असते. हेलिपॅड नसेल तर तात्पुरते का होईना, त्याची तजवीज करावी लागते. पण, बंगळुरातील एका व्हायरल छायाचित्राने इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली, ज्यात या मेट्रो शहरात थेट भर रस्त्यात एक हेलिकॉप्टर उतरले असल्याचे दिसून आले!
टि्वट केल्या गेलेल्या या छायाचित्रात हे हेलिकॉप्टर शहरातील बरीच वर्दळ असलेल्या एका रस्त्यावर उतरवले गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. हेलिकॉप्टरच्या आजूबाजूने काही आश्चर्यचकित नागरिक आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी देखील होती. अशा वर्दळीच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरलेच कसे, याबद्दल उपस्थितात आश्चर्य व्यक्त केले जात होते.
बंगळूरमध्ये मागील काही वर्षांपासून ट्रॅफिक जॅमची समस्या अतिशय जटिल होत चालली असून राज्याच्या राजधानीत अपवाद वगळता सातत्याने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असतात. अशा परिस्थितीत यावर रामबाण उपाय म्हणून कोणी तरी थेट हेलिकॉप्टरने ये-जा करणे पसंत करत असेल, अशी मार्मिक टिपणी एका युझरने केली.