पुणे; पुढारी वृत्तसेवा : काही पंचांगांची गणित पद्धती भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाचा फरक येत असतो. अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण – उत्सवाबाबत संभ्रम निर्माण होतो. त्याकडे दुर्लक्ष करावे. यंदा श्रीगणेश चतुर्थी 19 सप्टेंबरलाच असून, अंगारक योगावरच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करावी, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये 19 सप्टेंबरला श्रीगणेश चतुर्थी असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या श्रीगणेश चतुर्थी 18 सप्टेंबरला की 19 सप्टेंबरला याबाबत चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबरलाच गणेशोत्सवाची सुरुवात होणार असल्याचे दाते यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, '18 सप्टेंबर रोजी तृतीया समाप्ती दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी असून, दुसर्या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी आहे.
त्यामुळे शास्त्रीय वचनाप्रमाणे 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी संपूर्ण माध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने यादिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट 1998 रोजी अशीच परिस्थिती असताना अशाच पद्धतीने निर्णय केलेला होता. अनेक कॅलेंडर, भारत सरकारचे राष्ट्रीय पंचांग, श्री स्वामी समर्थ पंचांग, निर्णयसागर, राजंदेकर पंचांग, दाते पंचांग आदी पंचांगांमध्ये दिल्याप्रमाणे मंगळवारी (दि.19) अंगारक योगावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणे योग्य होईल.
हेही वाचा