नाशिक : साश्रूनयनांनी जवान विकी चव्हाण यांना अखेरचा निरोप

नाशिक : साश्रूनयनांनी जवान विकी चव्हाण यांना अखेरचा निरोप
Published on
Updated on

 चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अमर रहे अमर रहे विकी चव्हाण अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय, असा एक ना अनेक घोषणांनी वीर जवान विकी (गणेश) अरुण चव्हाण (२४) यास सोमवारी (दि. ११) दुपारी १२ च्या सुमारास हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हरनूल पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.

सैन्य दलात जम्मू काश्मीर राज्यातील पुंछ (राजोरी) येथे नियुक्तीला असलेल्या विकी हा ग्रीको रोमन कुस्तीचा सराव करत असताना गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचे निधन झाले. त्याचे पार्थिव शनिवारी पुंछ येथून दिल्लीला आणि तेथून रविवारी (दि. 10) मुंबईला आणण्यात आले. सोमवारी (दि. ११) सकाळी १० वाजता विकीचे पार्थिव नाशिकहून चांदवडला आणण्यात आले.

विकीच्या स्वागतासाठी हरनूल गावकऱ्यांनी गावातील रस्त्यांवर शेणाचा सडा, आकर्षक रांगोळी अन फुले आच्छादली होती. गावात विकीचे पार्थिव येताच नागरिकांनी विकीच्या नावाचा जयजयकार केला. गावातून पार्थिव थेट घरी नेण्यात आले. यावेळी पोटचा गोळा तिरंग्यात लपटलेला पाहून आई गयाबाईने एकच हंबरडा फोडला. वडील अरुण, बहीण पूजा अन भाऊ चेतन यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहताना उपस्थितांचे डोळे पाणवले. अंतिम दर्शनानंतर विकीचे पार्थिव पुन्हा गावाकडे नेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी वीर जवान विकीला पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर नाशिक येथील लष्कराचे जवान आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलाने तीन वेळेस हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. लहान भाऊ चेतनने वीर जवान विकीच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी उपस्थितांनी वीर जवान विकीच्या नावाचा जयजयकार केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. उमेश काळे, प्रांत चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, जिल्हा सैनिक अधिकारी ओमकार कापले, देवळाली कॅम्पचे मेजर अविनाश कुमार, सुभेदार कमल सिंग, हवालदार सुभाष चंद्र आदींसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news