पुणे; पुढारी वृत्तसेवा : सारसबाग खाऊगल्लीच्या पुनर्वसनाची आयुक्तांची मंजुरी मिळालेली फाईलच महापालिकेतून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन आता पोलिस तक्रार देणार असून, नव्याने पुन्हा फाईल करणार आहे.
सारसबागेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना स्टॉल असल्याने नागरिकांना सारसबागेत जाताना त्याचा फटका सहन करावा लागतो. त्यात उत्तरेकडील प्रवेशद्व्राराबाहेर खाद्यपदार्थांचे 56 परवानाधारक स्टॉल असून, त्यांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र, या स्टॉलचे वाढीव बांधकामासह अतिक्रमणे होतात.
या अतिक्रमाणांवर पालिकेकडून सातत्याने कारवाई केली जाते. काही महिन्यांपूर्वी तर महापालिकेने ही खाऊगल्लीच सील केली होती. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी खाऊगल्लीच्या ठिकाणी वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांचे 56 स्टॉल सणस मैदानाच्या भिंतींलगत स्थलांतरित केले जाणार आहेत. यासंबंधीचा सुधारित आराखडा महापालिकेने व्यावसायिकांशी चर्चा करून तयार केला आहे. पेशवे ऊर्जा उद्यानाशेजारी पार्किंगच्या जागेत वाहनतळ विकसित केले जाणार आहे. तेथे किमान 500 वाहने थांबतील एवढी सुविधा विकसित केली जाणार आहे.
पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मंजुरी मिळाल्यानंतर बांधकाम विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला होता. त्यानंतर ही फाईल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस तक्रार देऊन नवीन फाईल तयार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. महत्त्वाच्या विभागातून ही फाईल गहाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा