पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग जोरात   | पुढारी

पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग जोरात  

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी, जादूचे प्रयोग, मनोरंजक गेम शो, लावणी तसेच कथाकथनाचे कार्यक्रम… अशा बहारदार कार्यक्रमांची मेजवानी यंदा रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवात अनुभवता येणार आहे. गणेशोत्सवाचे दहाही दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांना पाहता येणार असून, गणेश मंडळांसह सोसायट्यांमधील मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बुकिंग करण्यात आले आहे. कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी मंडळांकडून विचारणा होत असून, गणेशोत्सवात दहाही दिवस महाराष्ट्राभर कार्यक्रम सादर करण्यासाठी कलाकार सज्ज आहेत.
गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार्‍या रसिक प्रेक्षकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता यावी यासाठी उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही गणेश मंडळांसह सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून, महिलांसाठी खेळ पैठणीचा, विविध गेम शो, लावणीचे कार्यक्रम, रंगतदार स्पर्धा होणार असून, यासाठी कलाकारांकडे विचारणाही सुरू झाली आहे, तर काहींकडे कार्यक्रमांसाठी बुकिंगही झाले आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये पुण्यातील कलाकार सादरीकरण करणार आहेत. गणेशोत्सवाच्या  एका कार्यक्रमासाठी 10 ते 20 हजार रुपयांपर्यंतचे मानधन कलाकारांना देण्यात येते.
‘खेळ पैठणी’चा हा महिलांसाठीचा कार्यक्रम सादर करणा-या क्रांती मळेगांवकर म्हणाले, ‘महिलांसाठीच्या मनोरंजक खेळांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा सीझन खूप फायद्याचा ठरणार आहे. कला सादरीकरणाची कलाकारांना संधी मिळत आहे हे महत्त्वाचे आहे.’ एकपात्री कलाकार राहुल भालेराव म्हणाले, ’कोरोना काळात दोन वर्षे कलाकारांना काम नव्हते. पण, यंदाचे वर्ष कलाकारांसाठी महत्त्वाचे असून, अनेक कलाकारांना काम मिळाले आहे. त्यामुळे कलाकार आनंदी आहेत. प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सादरीकरणाच्या तयारीला लागला आहे.’

गणेश मंडळांबरोबर सोसायट्यांमध्येही कार्यक्रम

एकपात्री कलाकारांपासून ते ऑर्केस्ट्रातील कलाकापर्यंत सर्वांना मंडळे आणि सोसायट्यांच्या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राची लोकधारा, शाहिरी कार्यक्रम, नृत्यांवरील कार्यक्रम, नाट्यछटांवरील कार्यक्रम, गीत-संगीतावर आधारित कार्यक्रमांचे बुकिंग झाले आहे. गणेश मंडळांच्या ठिकाणी  आणि सोसायट्यांमध्ये कलाकार सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
दरवर्षी मी गणेशोत्सवाच्या दहाही दिवस एकपात्री कार्यक्रमांचे सादरीकरण करते. यंदा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे कार्यक्रम सादर करणार आहे. कार्यक्रमांसाठी बुकिंग झाले असून, ’अस्सा नवरा’ हा विनोदी कार्यक्रम आणि ’रंगतदार कथाकथन’ हा एकपात्री कार्यक्रम मी सादर करणार आहे. सध्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीत व्यस्त आहे.
– कल्पना देशपांडे, एकपात्री कलाकार
हेही वाचा

Back to top button