Nashik Rain : नाशिकमध्ये अवघ्या सहा तासांत ५५.४ मिमी पावसाची नोंद

Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे महिनाभराच्या विश्रांतीनंतर कमबॅक करणाऱ्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम आहे. शहर, परिसरात शुक्रवारी (दि. 8) पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार सरींमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने सकाळच्या वेळेत वाहतूक मंदावली, तर गंगापूर धरणातील विसर्गामुळे गोदाघाट पाण्याखाली गेला. शहरात सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या सहा तासांच्या कालावधीत तब्बल ५५.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

जून, जुलै व ऑगस्टमध्ये ओढ देणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून जोर पकडला आहे. शहर व परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार सरी बरसल्या. नाशिककरांची पहाट पावसाच्या आगमनाने झाली. सततच्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले. गंगापूर रोड, रामवाडी, मेरी आदी भागांत सखल ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सकाळच्या वेळी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामावर निघालेल्या चाकरमान्यांचेही पावसाने हाल झाले, तर दुसरीकडे पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ उशिरा सुरू झाली.

शहरातील उपनगरांनाही पावसाने जोरदार दणका दिला. पंचवटी परिसर, इंदिरानगर, सिडको, सातपूर आणि नाशिकरोडमध्येही जनजीवन विस्काळीत झाले. सिडको आणि सातपूर परिसरात दोन ते तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पडलेली झाडे वेळेत हटविल्याने वाहतुकीवर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. 

सलगच्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल २ हजार ८० क्यूुसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदाघाट परिसर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने व टपऱ्या सुरक्षित स्थळी हलविण्याची लगबग सुरू होती.

महापालिकेचे पितळ उघडे

पावसाचा जोर अधिक असल्याने शहरातील रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. दुसरीकडे शहरातील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचे पितळ पावसाने उघडे पाडले. त्यामुळे शहरवासीयांनी मनपाच्या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त केला.

शहरात बत्ती गुल

पावसाचा जोर वाढल्याने सकाळपासून शहरातील ठिकठिकाणी महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला. उपनगरांतील काही भागांमध्ये तासन‌्तास बत्ती गुल झाली होती. त्यामुळे कामे ठप्प झाल्याने शहरवासीयांची चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, द्वारका परिसरात उड्डाणपुलाखाली चिखल साचल्याने दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात होत होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने दखल घेत उड्डाणपुलाखालील रस्ते धुऊन काढले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news