पुणे : कमला नेहरू रुग्णालयात महिला डॉक्टरवर अरेरावी | पुढारी

पुणे : कमला नेहरू रुग्णालयात महिला डॉक्टरवर अरेरावी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महिला डॉक्टरने मुलीला कामाबाबत ओरडल्याने सुरक्षारक्षक असलेल्या आईने डॉक्टरवर अरेरावी केल्याचा प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडला. डॉक्टर, नर्स यांना धमकावल्याची रुग्णालयातील ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. त्यामुळे बहुतांश सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षारक्षक महिलेची मुलगी कमला नेहरु रुग्णालयात नर्सिंग वॉर्डमध्ये नोकरी करते. अनेकदा चुका दाखवूनही कामात सुधारणा न झाल्याने महिला वैद्यकीय अधिकार्‍याने मुलीला काम जमत नसेल, तर दुसर्‍या विभागात जा, असे खडेबोल सुनावले.

मुलीच्या आईने दोन-तीन राजकीय व्यक्तींना रुग्णालयात बोलावून घेतले आणि महिला डॉक्टरलाच घरी बसविण्याची धमकी दिली. महिला डॉक्टरने महापालिकेमध्ये लेखी तक्रार नोंदवली. कमला नेहरू रुग्णालयात 34 सुरक्षारक्षक कामावर आहेत. राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने यातील अनेकांनी नोकरी मिळवली असून, अनेक वर्षांपासून येथेच ठाण मांडले आहे. रुग्णालयात नव्याने रुजू झालेले डॉक्टर, नर्स, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांच्यावर रक्षक नेहमीच चढ्या आवाजात बोलताना दिसतात. याबाबत यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारही नोंदवली आहे.

काय घडला प्रकार?

महिला सुरक्षारक्षक दोन-तीन राजकीय लोकांसह महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरली. डॉक्टरला धमकीवजा भाषेत बोलत ‘एका दिवसात घरी बसवू,’ अशा भाषेत बोलत व्हिडीओ शूटिंगला सुरुवात केली. महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली आहे.

अनेकदा वैद्यकीय अधिकारी बाहेगावाहून रुग्णालयात रुजू झालेले असतात. अशा वेळी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने बसलेल्या सुरक्षारक्षकांकडून अरेरावी, शिवीगाळ, दादागिरी केली जाते. गेल्या महिनाभरात तिसर्‍यांदा हा प्रकार घडला आहे. माझ्या तक्रारीची दखल घेऊन माधव जगताप यांनी तातडीने सुरक्षारक्षकांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. डॉक्टर असोसिएशतर्फे मी त्यांचे आभार मानते. मात्र, अद्याप अनेक जण नवीन ठिकाणी रुजू झालेले नाहीत.

– महिला वैद्यकीय अधिकारी, कमला नेहरू रुग्णालय

हेही वाचा

सोलापूर : पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर फेकला भंडारा

सोलापूर : पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर फेकला भंडारा

पुणे : धर्मादाय आयुक्तालयाकडून रुबी हॉल रुग्णालयाला नोटीस

Back to top button