शरद पवार : ‘जीएसटी परतावा तत्काळ द्यावा, राज्य सरकारला लोकांना मदत करता येईल’ | पुढारी

शरद पवार : 'जीएसटी परतावा तत्काळ द्यावा, राज्य सरकारला लोकांना मदत करता येईल'

बारामती : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने राज्याला जीएसटी रक्कम तात्काळ द्यावी. ही रक्कम मिळाल्यास राज्य सरकारला लोकांना मदत करणारा निर्णय घेणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.

देशभरातील पोटनिवडणुकीत भाजपला जबर दणका बसल्यानंतर मोदी सरकारने तातडीने हालचाल करताना पेट्रोल ५ रुपये, तर डिझेलवर १० रुपये उत्पादन शुल्कात कपात काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी सुद्धा कर कपात केली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपकडून कपात कधी करणार? अशी विचारणा सुरु आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा

एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी आम्हाला संप पुढे न्यायचा नाही असे सांगितले आहे. एसटी संकटात आहे हे आम्हाला ठावूक आहे. दिवाळीच्या सणात लोकांना त्रास होवू नये ही आमची भूमिका आहे पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे संप सुरु आहे. ८५ टक्के बस रस्त्यावर आहेत, १५ टक्के लोकांनी संपाची भूमिका घेतली आहे. संस्थेच्या आणि लोकाच्या हितासाठी हा विषय एकदाचा संपवावा. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे काही पथ्य पाळावी लागत आहेत. राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. याचा परिणाम कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस कमी होते आहे. यंदाची दिवाळी भेटावे का नाही असे वाटत होते. मात्र भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. आज मास्क लावून सोशल डिस्टंसिंग ठेवून शुभेच्छा घेतल्या, शुभेच्छा दिल्या याचे समाधान आहे. मागील कोरोना काळात पूर्ण आर्थिक नुकसान झाले. आता उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. त्यातून नुकसान भरुन निघून दिलासा मिळेल.

हे ही वाचलं का?

Back to top button