

बारामती; पुढारी वृत्तसेवा : गेली दोन वर्षे खंड पडलेल्या दिवाळी पाडवा (Diwali Padva) स्नेहमेळाव्यानिमित्त बारामतीत पवार कुटुंबीय शुक्रवारी (दि. ६) नागरिकांना भेटून दिपावली शुभेच्छा स्वीकारत आहेत. यंदा प्रथमच या स्नेहमेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती आहे. अजित पवार यांना कोरोनाची शक्यता आहे, त्यामुळे ते स्नेहमेळाव्याला अनुपस्थित असल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले.
दिवाळी पाडव्याला (Diwali Padva) पवार कुटुंबियांचा स्नेहमेळावा पार पडतो. गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र येत असतात. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पाडव्याला भेटीचा प्रघात सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्षे हा स्नेहमेळावा झालेला नव्हता. यंदा स्नेहमेळावा होत असला तरी कोरोनामुळे सामाजिक अंतर राखले जावे, यासाठी गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानाऐवजी अप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कदाचित कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. घरातील दोन कामगार व गाडीचा चालक यांनादेखील कोरोना झाल्यामुळे रिस्क नको म्हणून आजच्या गर्दीवेळी त्यांनी येऊ नये असे आम्ही त्यांना सांगितले आहे." दरम्यान राज्यातील खासदार, आमदार, नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी बारामतीत पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. खासदार पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत.
पहा व्हिडीओ : काय आहे लक्ष्मीपूजनाचे महत्व?