aryan khan drug deal : आर्यन खान अटक प्रकरणाला नवे वळण, २५ कोटींच्या डीलचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या हाती | पुढारी

aryan khan drug deal : आर्यन खान अटक प्रकरणाला नवे वळण, २५ कोटींच्या डीलचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या हाती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपासंबंधी मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज लोअर परळ परिसरातील असून, यात शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. (aryan khan drug deal)

याच ठिकाणी 25 कोटींच्या खंडणीचे डील झाल्याचा मुंबई पोलिसांना संशय असून, या प्रकरणात आता गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ‘एनसीबी’चा पंच असलेल्या प्रभाकर साईल याने ‘एनसीबी’च्या अधिकार्‍यावर पैसे वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत.

aryan khan drug deal : लोअर परळ परिसरातील महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती

साईल याच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांचे सहा अधिकारी तपास करत आहेत. याच तपासात लोअर परळ परिसरातील महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

साईल याने केलेल्या दाव्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा कार पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

इनोव्हा कारमध्ये पोलिस लिहिलेली पाटीसुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसत असून, या सीसीटीव्हीच्या आधारे आता मुंबई पोलिस पुढील तपास करत आहेत. जर आणखी काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले, तर किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सीसीटीव्ही फुटेजनंतर खंडणीची मागणी करण्यात आली होती का? ही खंडणी कोणी मागितली आणि पैसे कोण घेणार होते, या सर्वांचा उलगडा होणार आहे.

प्रभाकर साईल याने सांगितलेली ठिकाणे आणि घटनांच्या आधारे मुंबई पोलिस सीसीटीव्ही फुटेजसोबतच यातील व्यक्तींचे टॉवर लोकेशन आणि अन्य महत्त्वाच्या बाबी पडताळून बघत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाबसुद्धा नोंदविणार आहेत.

Back to top button