Baramati Maratha Protest : अजित दादांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा नाहीतर त्यांची साथ सोडावी… काटेवाडीत रास्ता रोको

Baramati Maratha Protest : अजित दादांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा नाहीतर त्यांची साथ सोडावी… काटेवाडीत रास्ता रोको

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी काटेवाडी सोसायटीचे चेअरमन स्वप्निल काटे म्हणाले, जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने येथे जमलो होतो. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर फुल्या मारण्याचे निश्चित करण्यात आले;

मात्र यावेळी अजितदादांचा फोटो का नव्हता अशी विचारणा करण्यात आली जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत ते जबाबदार आहेत, आम्ही समस्त काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना एकच विनंती करतो दादांनी एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडावी. आम्ही सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना अमोल काटे म्हणाले, ज्यांना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलनावर अमानुषपणे लाठीहल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. लहान मुले, महिला यांना देखील सोडले नाही‌. आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले.

मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न का केला. कारण जालना येथे काही दिवसात शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून पोलिसी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक आंदोलकांवर तसेच युवक, महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणार आहे, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news