जादूटोण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला गंडा | पुढारी

जादूटोण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला गंडा

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील रास्ता पेठ परिसरातील व्यवसाय असलेल्या एका दुकानदाराची परदेशात व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने जादूटोणा करून तब्बल 90 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ (वय 45, रा. कोंढवा) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमाआवादी (वय 40, रा. कॅम्प), सीमा नादीर नईमाआवादी (वय 35), मौलाना शोऐब मैनुद्दीन अत्तार (वय 35, रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (वय 50), खालीद मैनुद्दीन आत्तार (वय 40) व इरम शोऐब आत्तार (वय 32, रा. बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 29 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नादीर नईमाआवादी, सीमा नईमाआवादी व मौलाना आत्तार यांचा इम्पोर्ट व्यवसाय नाही, हे इतर आरोपींना माहिती असूनदेखील त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने आपसात संगनमत करून कट रचला. फिर्यादी शेख बासीत व त्यांची पत्नी यांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. संबंधित तीन आरोपींनी खोटी कागदपत्रे दाखवून साऊदी मक्का येथे मोठा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर मौलाना शोऐब अत्तार याने जादूटोणासारखी अघोरी कृत्ये करून त्याकरिता आरोपी नादीर हुसैन अली याने दुजोरा दिला.

फिर्यादींना गुंगीचे पाणी पिण्यास लावून त्यांच्याकडून तावीज बनविण्याकरिता रोख 25 हजार रुपये घेण्यात आले. मात्र, तावीज न देता, तसेच वेळोवेळी तक्रारदार यांचेकडून त्यांचे इम्पोर्ट, एक्सपोर्टचे व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एकूण 90 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. रणदिवे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाची बातमी ! आगामी काळात राज्यात अशी असेल पावसाची स्थिती

अहमदनगर : शिक्षण परिषदेच्या वेळेत अखेर बदल

Back to top button