आता अंगणवाडीसेविका चालविणार पाळणाघर! | पुढारी

आता अंगणवाडीसेविका चालविणार पाळणाघर!

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : सध्या अनेक महिला नोकरीसाठी घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांना आपल्या लहान मुलांची चिंता असते. लहानग्यांना कोणाकडे ठेवून घराबाहेर पडायचे म्हणजे आईचे मन धजावत नाही, अशा वेळी त्यांना पाळणाघर हा पर्यात असू शकतो; मात्र अनेक पालकांची खासगी पाळणाघरात ठेवण्याची ऐपत नसते; तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय पालकांना हे परवडत नाही. अशा सर्व स्तरातील पालकांच्या पाल्यांसाठी आता शासनाकडून अंगणवाडी सेविकामार्फत पाळणाघर चालविण्यात येणार आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाळणाघर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोकरी करणार्‍या महिला तसेच बाळाला घरी सोडून कामाला जाणार्‍या महिला अशा महिलांच्या बालकांना पाळणाघरात ठेवण्यासाठी ही योजना आहे. आज एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असल्यामुळे पाळणाघर ही प्रत्येक पालकांची गरज झाली आहे. दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यास मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नकळत्या वयात अनोळखी ठिकाणी ठेवणे हा खूप मोठा धोका पालकांसमोर असतो.

नोकरदार पालकांसमोर मुलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे. काही महिला पालकांना मुलांच्या सुरक्षेसाठी नोकरी करता येत नाही. त्यामुळे मुलांच्या गरजा भागविणे कठिण होते. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांवर योग्य संस्कार, पालकपोषण, संगत याची काळजी असते. त्यामुळे ते पाळणाघराच्या शोधात असतात. खासगी पाळणाघरात मुलांना ठेवणे परवडत नाही. ते फक्त उच्चभ्रू पालकांना परवडते. मात्र सर्वसामान्य व मध्यमवर्गीय पालकांना शासकीय पाळणाघराचा लाभ घेता येईल.

अशी असेल योजना…

याकरिता सध्याच्या अंगणवाडीजवळ पाळणाघरासाठी स्वतंत्र खोली आवश्यक आहे. त्या खोलीकरिता स्वतंत्र भाडे देण्यात येणार आहे. तसेच पाळणाघर चालवण्यासाठी एक नवीन कार्यकर्ती व मदतनीस नेमण्यात येणार आहे. तसेच ज्या अंगणवाडीत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. तेथील सेविका व मदतनीस यांनादेखील वाढीव मानधन मिळणार आहे. सदर पाळणाघरात 0 ते 6 वर्ष वयोगटातील किमान 25 मुले असणे आवश्यक आहे. पाळणाघराची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.

पाळणाघरासाठी प्रस्ताव मागविणे सुरू

पिंपरी-चिंचवड शहरात 361 अंगणवाडी प्रकल्प सुरू आहेत. जे सध्या भाड्याच्या खोलीत चालविल्या जातात; मात्र, सर्वच अंगणवाड्यामध्ये पाळणाघर सुरू करता येणार नाही. ज्या अंगणवाड्याशेजारी जागा उपलब्ध आहे किंवा होऊ शकते. अशा अंगणवाडी सेविकांकडून प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू आहे. त्यांना पाळणाघर सुरू करता येणार आहे. त्यांच्याकडची माहिती मुख्य अंगणवाडी सेविकांना द्यायची आहे.

अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वयोगटातील मुले असतात. पाळणाघरात 0 ते 6 वर्षाच्या मुलांचा समावेश असणार आहे. याठिकाणी काम करणार्या सेविका आणि मदतनीस यांना मानधन दिले जाणार आहे. पाळणाघरासाठी शासनाकडून आहार आणि खेळणी यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या प्रस्ताव मागविणे सुरू आहे.

-सुरेश टेळे,
बालविकास प्रकल्प अधिकारी

हेही वाचा

पिंपरी : 357 होर्डिंगचालकांना महापालिकेची नोटीस

गोंदिया : विजेच्या धक्क्याने तीन बिबट्यांचा मृत्यू

हरेगाव मारहाण प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यात निषेध

Back to top button