पिंपरी : 357 होर्डिंगचालकांना महापालिकेची नोटीस | पुढारी

पिंपरी : 357 होर्डिंगचालकांना महापालिकेची नोटीस

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील नियमबाह्य असलेल्या एकूण 357 होर्डिंगचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास ते होर्डिंग तोडून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिला आहे. परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग असणे, एका बाजूची परवानगी घेऊन दोन्ही बाजूने होर्डिंग लावणे, होर्डिंगवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिलेला परवाना क्रमांकाचा छोटा फलक न लावणे या कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

या तसेच, अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. या पुढे शहरात एकही अनधिकृत जाहिरात होर्डिंग ठेवण्यात येणार नाही, असे उपायुक्त इंगळे यांनी स्पष्ट केले आहे. शहरात 20 एप्रिल ते आतापर्यंत तब्बल 168 अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले आहेत. त्यातील 95 होर्डिंग मालक व चालकांनी काढून घेतले आहेत. तर, एकूण 73 होर्डिंग महापालिकेने तोडून जप्त केले आहे. त्यातून मिळालेल्या भंगारातून पालिकेस 2 कोटी 30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

न्यायालयात गेलेल्या अनधिकृत 281 होर्डिंपैकी 263 होर्डिंगचे एकूण 4 कोटी 19 लाख 50 हजार 816 रुपये परवाना शुल्क महापालिकेकडे जमा करण्यात आले आहेत. न्यायालयात गेलेल्या होर्डिंगचालकांकडून पाचपट शुल्क घेऊन त्याच्या होर्डिंगला रितसर परवाना दिला जाणार आहे. पाचपट शुल्क न भरणारे होर्डिंग तोडून जप्त करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त इंगळे यांनी सांगितले.

त्या हाऊसिंग सोसायटींकडूनही परवाना शुल्क घेणार

लोकवस्ती, वर्दळीच्या ठिकाणी तसेच, अनधिकृत बांधकामांवर असलेल्या जाहिरात होर्डिंगमुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका आहे. अशा प्रकाराची धोकादायक जाहिरात होर्डिग तोडण्यात येणार आहेत. तसेच, ज्या इमारतीवर होर्डिंग लावले आहे त्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, त्या इमारत किंवा संबधित हाऊसिंग सोसायटीकडूनही अतिरिक्त परवाना शुल्क वसुल केला जाणार आहे, असे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा

हरेगाव मारहाण प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यात निषेध

डॉल्बीमुक्त गणराय आगमन, विसर्जन मिरवणुकीचा निर्धार

सांगली : भरदिवसा फ्लॅट फोडला

Back to top button