९ कैद्यांचा तीन तुरुंगाधिकाऱ्यांसह ७ कर्मचाऱ्यांवर फिल्मीस्टाइल हल्ला | पुढारी

९ कैद्यांचा तीन तुरुंगाधिकाऱ्यांसह ७ कर्मचाऱ्यांवर फिल्मीस्टाइल हल्ला

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : झडतीची टीप का देत नाही म्हणून न्यायायलीन कोठडीतील कैद्याने शिक्षाधीन कैद्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आल्यावर धमकी देणाऱ्या कैद्याची चौकशी सुरु केली. त्याचवेळी त्याने आरडाओरड करीत तुरुंगाधिकाऱ्यांसह जेल पोलिसांवर हल्ला चढविला. त्याला साथ देत नऊ कैद्यांनी तीन तुरुंगाधिकाऱ्यांसह ७ जेल पोलिसांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, जेल गरम करण्याची कैद्यांना चिथावणी दिली. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात 27 ऑगस्टला सकाळी पावणेआठ वाजता हा धुमाकूळ झाला. या प्रकारामुळे जेलमध्ये दहशत पसरली आहे.

अधिक माहितीनुसार, तरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर (36) हे फिर्यादी आहेत. 27 आॅगस्टला पहाटे ५ वाजता त्यांची ड्यूटी सुरु झाली. विशेष झडती पथकात मोडकर यांच्यासह तुरुंगाधिकारी अमित गुरव, ज्ञानेश्वर चव्हाण, कर्मचारी अशोक रावते, योगेश चिंतामणी, रामेश्वर पालवे, गणेश कामठे, सुनील सानप, विजय नेमाने, सुमंत मोराळे आदींची ड्यूटी होती. कारागृहातील कैद्यांजवळील अवैध वस्तू शोधणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम हे पथक करते. कारागृहात जनरल झडती सुरु असताना ७.४५ वाजता नवीन सर्कलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅरेक क्र. ५ मधील शिक्षाधीन बंदी क्र. सी 8234 बद्रीनाथ काशिनाथ शिंदे याने अंतर्गत सुरक्षा प्रमुख अधिकारी सतीश हिरेकर यांना भेटून न्यायधीन बंदी 273/2023 शाहरूख शेख हा झडतीची टीप देण्यावरून मारहाण करीत असल्याची तक्रार केली. तसेच, कोल्हापूर जेलमध्ये मर्डर करून आलोय, तुझाही मर्डर करील, अशी धमकी देत असल्याचे हिरेकर यांना सांगितले.

चाैकशीला बोलावताच हल्ला

कैदी बद्रीनाथ शिंदेची तक्रार गांभीर्याने घेऊन अंतर्गत सुरक्षा अधिकारी हिरेकर यांनी शाहरूख अकबर शेख याला चौकशीला बोलावले. तो आरडाओरड करीतच बाहेर आला. लगेचच त्याने बंदीनाथ शिंदेला मारहाण सुरु केली. त्यांचा वाद सोडवित असताना शाहरूख शेखने तरुंगाधिकारी प्रवीण मोडकर यांना खाली पाडून मारहाण सुरु केली. त्यानंतर बॅरेक क्र. १ मधील कैदी आरडाओरड करून दरवाजा उघडून बाहेर पडले. त्यातील न्यायाधीन बंदी क्र. 105 सतीश खंदारे याने कारागृह शिपाई सुमंत माेराळे यांना मारहाण केली. त्यानंतर कैदी गजेंद्र मोरे, निखिल गरड, किरण साळवे, ऋषीकेश तनपुरे यांनी तुरुंगाधिकाऱ्यांच्या अंगावर धाऊन जात झटापट करून मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

शाहरूख भाई अन् मोरे दादा

कैदी आणि तरुंगाधिकाऱ्यांमधील झटापट सुरू असतानाच बॅरेक क्र. 5 मधील कैदी आनंद लाेखंडे, अनिकेत दाभाडे, राज जाधव यांनी आमच्या शाहरूख भाई आणि मोरे दादाला काही केले तर तुमच्या सर्वांना मारून टाकू, जेल गरम करू, अधी धमकी देत दरवाजा जोरजोरात ओढून तोडण्याचा प्रयत्न केला.

जेलमधील धोक्याची शिट्टी वाजविली

जेलमधील वाद धोक्याच्या पातळीवर गेल्यानंतर तेथे ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी धोक्याची शिट्टी वाजवून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र केले. त्यांनी कैद्यांवर वर्चस्व निर्माण करून काही वेळातच जेलमधील वातावरण शांत केले. काही क्षणांसाठी जेलमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

हल्ला करणारे कैदी

शाहरूख अकबर शेख (30, न्यायाधिन बंदी 273), सतीश काळूराम खंदारे (30, न्यायाधिन बंदी 105), गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे (42, न्यायाधिन बंदी 898), निखिल भाऊसाहेब गरड (25, न्यायाधिन बंदी 928), किरण सुनील साळवे (22, न्यायाधिन बंदी 499), ऋषीकेश रवींद्र तनपुरे (25, न्यायाधिन बंदी 189), अनिल शिवाजी गडवे (25, न्यायाधिन बंदी 244), अनिकेत महेंद्र दाभाडे (22, न्यायाधिन बंदी 314), राज नामदेव जाधव (26, न्यायाधिन बंदी 143), अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Back to top button