रत्नागिरी : लाचखोर तलाठ्याविरोधात खेडमध्ये गुन्हा दाखल | पुढारी

रत्नागिरी : लाचखोर तलाठ्याविरोधात खेडमध्ये गुन्हा दाखल

खेड, पुढारी वृत्तसेवा :  वारस तपास करून नाव दाखल करण्यासाठी तलाठ्याने एका इसमाकडे एक हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी  लाच लुचपत प्रतिबंधक पथकामार्फत सोमवारी (दि.२८) खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणाऱ्या तक्रारदार यांचे वडिलांचा सन २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या जमीन मिळकतीचा वारस तपास होऊन तक्रारदार यांचे नावे दाखल करण्यासाठी ते तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शिवतर सजाचे तत्कालीन तलाठी अमोल महावीर पाटील (वय ३१) यांनी तक्रारदार यांचेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी यांनी पाचशे रुपये लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाच मागणी केल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी चे पोलीस उप अधिक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, हवालदार विशाल नलावडे, कॉन्स्टेबल राजेश गावकर, वैशाली धनवडे, प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का?

Back to top button