सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच | पुढारी

सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात ऊन- तुरळक पावसाचा खेळ सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणे कधी भरणार? असा प्रश्न शेतकर्‍यांसह नागरिकांना पडला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्येच धरणात 94.35 टक्के पाणीसाठा होता. मात्र यावर्षी ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणे 80 टक्क्यांवरच आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरुवात केली. मात्र जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली या तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या तालुक्यातील पूर्व भागाला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही तीच परिस्थिती आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील सर्व धरणे भरतात. 15 ऑगस्टनंतर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. मात्र पावसानेच उघडीप दिल्याने धरणे भरणार कधी असा प्रश्न आता पडला आहे. नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत. तसेच दिवसेंदिवस भूजल पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.

कोयना धरणात गतवर्षीपेक्षा 14.19 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 80.43 टक्के आजचा पाणीसाठा आहे. धोम धरणात आज गतवर्षीपेक्षा 14 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 81.95 टक्के आजचा पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात आज गतवर्षीपेक्षा 4.72 टक्के पाणीसाठा जास्त आहे. धरणात 96.72 टक्के आजचा पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात गतवर्षीपेक्षा 13.01 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 80.08 टक्के आजचा पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात गतवर्षीपेक्षा 37 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 59.79 टक्के आजचा पाणीसाठा आहे. तारळी धरणात गतवर्षीपेक्षा 2.34 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 91.10 टक्के आजचा पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्प 58.85 टक्क्यांवरच…

सातारा जिल्ह्यात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग (मराठवाडी) हे मध्यम प्रकल्प आहेत. मात्र राणंद, येरळवाडी व आंधळी धरणात 0 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावामध्ये पाण्याची ओरड सुरू आहे. नेर 15.63 टक्के, नागेवाडी 41.20 टक्के, मोरणा 77.69 टक्के, उत्तरमांड 67.67 टक्के, महू 79.91 टक्के, हातगेघर 46.80 टक्के, वांग 72.35 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 58.85 टक्क्यांवरच आहे.

Back to top button