बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांचे जंगी स्वागत; जेसीबी, मशिनमधून फुलांचा वर्षाव | पुढारी

बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांचे जंगी स्वागत; जेसीबी, मशिनमधून फुलांचा वर्षाव

बारामती, पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी (दि. २६) बारामतीत जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी जेसीबी, मशिनमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव कऱण्यात आला. क्रेनद्वारे हार घालत त्यांचे स्वागत करण्यात आले.
बॅंड पथक, ढोलपथकासह ओपन जीपमधून त्यांची मिरवणूक निघाली. शहरातील कसबा येथे पवार यांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणूकीत पवार यांच्या सोबत त्यांचे पुत्र पार्थ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे सहभागी होते. मशिनद्वारे संतोष गालिंदे व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ, विश्वासराव देवकाते, संजीवनी ग्रूप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आदींनी क्रेनद्वारे पवार यांना हार घातले. एकता ग्रूपच्या वतीने अल्ताफ सय्यद व सहकाऱ्यांनी मिरवणूकीत सहभागींना लाडू वाटप केले. अनेक कार्यकर्त्यांनी मिरवणूकीत सहभागींसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.
शहरासह तालुक्याच्या विविध भागातून कार्यकर्त्यांनी भव्य दुचाकी रॅली काढत मिरवणूक व सभेत सहभाग घेतला. व्यापारी मंडळासह ज्योतिचंद भाईचंद सराफ पेढीचे रोहित सराफ यांनीही त्यांचे स्वागत केले. बारामतीतील सभा व मिरवणूकीचे नियोजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल आदींनी चोखपणे केले.
तब्बल ६५ दिवसानंतर अजित पवार शनिवारी बारामतीत दाखल झाले. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. मिरवणूकीतही तो दिसून आला. मिरवणूकीमध्ये बारामतीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. अमाप उत्साह दिसून आला. प्रचंड गर्दीमुळे रस्ते फुलुन गेले. अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोष्णाबाजी करण्यात आली. चौका चौकात डीजेसह भव्य व्यासपीठांची उभारणी करण्यात आली होती. जिल्हाभरातून आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचा-यानी बंदोबस्त ठेवला.

उत्साही कार्यकर्ता थेट क्रेनला लटकला

पवार यांची पुष्पहार घालत स्वागत करण्यासाठी एका उत्साही कार्यकर्त्याने थेट क्रेनच्या दोरीला बांधून स्वतःला लटकून घेतले. पवार यांची ओपन जीप जवळ येताच त्यांना  गुलाबाच्या फुलांचा हार घातला. कार्यकर्त्याच्या या उत्साहामुळे पवार यांनी डोक्याला हात लावत. त्याला पुन्हा क्रेनवर जायला सांगितले.
हेही वाचा: 

Back to top button