Pune Crime : लग्नाच्या आणाभाका एकीला, साखरपुडा दुसरीबरोबर, डॉक्टर तरूणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा - पुढारी

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका एकीला, साखरपुडा दुसरीबरोबर, डॉक्टर तरूणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

Pune Crime : विवाहसंकेत स्थळावरून झालेल्या ओळखीनंतर डॉक्टर तरूणीला तीन वर्ष लग्न करतो असे सांगत आणाभाका घेतल्या. पण दुसरीबरोबर साखरपुडा करणार्‍या एकावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरूणीने विचारणा केल्यानंतर संशयित आरोपीने तरूणीची बनावट प्रोफाइल तयार करून त्यावर अश्लील मेसेज प्रसारीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुधांशू प्रदिपकुमार पारीख (वय 37, रा. आदित्य रेसीडेन्सी, पिंपळे निलख) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 36 वर्षीय डॉक्टर तरूणीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधांशू पारिख आणि फिर्यादी तरूणीने मेट्रोमनी या वेबसाइटवर लग्न जुळण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यानुसार दोघांची 2016 मध्ये ओळख झाली. दोघांमध्ये लग्नाच्या अनुषंगाने 2019 दरम्यान व्यवस्थित बालेले सुरू होते. परंतु, अचानक सुधांशुने दुसर्‍या तरूणीसोबत साखरपुडा केला. साखरपुड्याची कुणकुण फिर्यादी तरूणीला लागल्यानंतर तिने सुधांशूकडे याबाबत विचारणा केली. तिने विचारणा केल्याच्या रागातून सुधांशू आणि त्याच्या आई वडिलांनी तरूणी काम करत असलेल्या क्लिनीकवर येऊन तिला शिवीगाळ केली. तसेच फोन करून तिची बदनामी केली. (Pune Crime)

यादरम्यान फिर्यादीच्या नावाची बनावट प्रोफाइल तयार करून त्यावर अश्लिल पोस्ट प्रसारीत केल्या. आरोपीच्या या कृत्यामुळे अनोळखी लोकांनी तिला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. दरम्यान, सुधांशू विरोधात तरूणीने विनयभंग, धमकावणे, बदनामी करणे तसेच आयटी अ‍ॅक्टच्या कलम 67 नुसार फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास अलंकार पोलिस करीत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : खुसखुशीत खमंग चकली रेसिपी आणि टिप्स | Chakli Recipe

Back to top button