

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे अडीच महिने सरले तरी बारामती तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. दर पावसाळ्यात हिरव्यागार, विलोभनीय दिसणार्या डोंगररांगा ओस पडल्या आहेत. दुष्काळसदृश स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, पिके कशी जगवायची? असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. जिरायती भागात समस्या अधिक तीव्र झाली असताना आता बागायती पट्टा पाण्यासाठी टाहो फोडू लागला आहे.
बारामती तालुक्यात पाऊस पडावा अशी आर्त हाक शेतकरी देतो आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. या महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. जिरायती भागातील शेतकर्यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली आहे. नेहमीच वेळेत पडणारा पाऊस लांबल्याने यंदा शेती उत्पादनात मोठी घट होणार आहे. याशिवाय जगण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. पाण्याअभावी बाजरी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल, मूग आणि चारा पिके यंदा झालेलीच नाहीत. पर्यायाने शेतकर्यांना दुष्काळाची जाणीव होऊ लागली आहे. पावसासाठी देवाचा धावा सुरू असून, श्रावण महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा शेतकर्यांना आहे. तालुक्यातील फक्त 24 टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरवर्षी तुडुंब वाहणारी कर्हा आणि निरा नदी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी ओढे, नाले, विहिरी, तळी कोरडीच आहेत.
पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असल्याने उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरले जात आहे. विहिरी आणि कुपनलिकांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शेतीला पाण्याची टंचाई जाणवत आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीची तहान भागवली जात आहे. या भागाला वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
बागायती भागात पाण्याची समस्या निर्माण झालेली असताना जिरायती भागातील स्थिती अधिक विदारक आहे. तेथे चार्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थ आता चारा छावण्यांची मागणी करू लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचे साठे आता जवळपास संपत चालले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर टँकर सुरू करावे लागतील, अशी स्थिती आहे.
हेही वाचा