पुणे : यल्ल्याच्या भावाची टीप अन् म्हस्केचा ‘गेम’!

पुणे : यल्ल्याच्या भावाची टीप अन् म्हस्केचा ‘गेम’!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेली खुनाच्या प्रयत्नाची केस मागे घे' म्हणून नितीन म्हस्के हा सागर ऊर्फ यल्ल्याला धमकावत होता. 'केस मागे घेतली नाही तर तुझा गेम करणार' असे तो म्हणत होता. यल्ल्याच्या मनात म्हस्के आपला गेम करणार ही भीती होती. त्याच भीतीपोटी आपल्याला जिवंत राहायचे असेल, तर म्हस्केचा काटा काढला पाहिजे असे ठरवून यल्ल्या आणि त्याच्या साथीदारांनी म्हस्केचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये यल्ल्याच्या मावस भावाने महत्त्वाची भूमिका निभावली असून, त्यानेच म्हस्केची टीप दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं?

नितीन म्हस्के आणि त्याच्या साथीदारांनी सागर ऊर्फ यल्ल्या याच्यावर नोव्हेंबर 2022 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात खुनी हल्ला केला होता. यल्ल्या हा त्याच्या मित्राच्या वाढदिवसाला गेला होता. त्या वेळी एकाच हॉटेलच्या पार्किंगमध्ये समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. पाठलाग करून यल्ल्याला म्हस्के आणि त्याच्या साथीदारांनी यल्ल्याला सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारहाण केली होती तसेच पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. यल्ल्याला बेदम मारहाण झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची हालचाल होत नव्हती. त्यामुळे तो मेला आहे असे वाटल्यामुळे म्हस्केच्या साथीदारांनी अंगावर लघुशंका केली होती. यल्ल्याला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

बुधवारी (दि.16) मध्यरात्री एकच्या सुमारास नितीन मोहन म्हस्के (वय 35, रा. ताडीवाला रोड) याचा प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड यल्ल्या आणि त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज समोरील सार्वजनिक रस्त्यावर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या, फरशीचे तुकडे डोक्यात घालून खून केला होता. त्यानंतर सर्व आरोपींनी पळ काढला.

मध्यवस्तीत दोन टोळ्यांतील पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे जोपर्यंत आरोपी पकडले जाणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका म्हस्के याच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे आरोपींना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे होते.

मात्र, अतिशय कौशल्यपूर्वक तपास करत दिवस-रात्र काम करून चोवीस तासांच्या आत सर्व सतरा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे शहर परिसर, कर्नाटक येथील रायचुर आणि बेळगाव येथून बेड्या ठोकल्या. त्यामध्ये नऊ मुख्य, तर आठ संशयित आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी, पाच मोबाईल असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय 35), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय 27), शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगाळे (वय 21), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय 28), मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय 24), साहील ऊर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय 20), लॉरेन्स राजु पिल्ले (वय 36), मनोज ऊर्फ बाबा विकास हावळे (वय 23), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 23), विकी ऊर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय 22), रोहित बालाजी बंडगर (वय 20, रा. सर्व ताडीवाला रोड परिसर), किशोर संभाजी पात्रे (वय 20, रमाबाई आंबेडकर रोड), गणेश शिवाजी चौधरी (वय 24, रा. कुंजीरवाडी), विवेक ऊर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय 25, रा. रामवाडी), इम—ान हमीद शेख (वय 31, रा. केशवनगर), आकाश ऊर्फ चड्डी सुनील गायकवाड (वय 22, रा. उत्तमनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील दहा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, एकट्या यल्ल्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई,शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, अशोक इंदलकर यांच्या पथकाने केली.

गुंडगप्पाची टीप अन् म्हस्केचा गेम..

यल्ल्या म्हस्केचा काटा काढण्यासाठी योग्य संधीच्या शोधात होता. काही दिवसांपासून तो त्याच्यावर पाळतदेखील ठेवत होता. मात्र, ती संधी मिळत नव्हती. म्हस्केच्या खुनात सर्वांत महत्त्वाची भूमिका निभावली ती यल्ल्याचा मावसभाऊ गुंडगप्पा भागराई याने.. चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा म्हस्के आपल्या मित्रासोबत घराबाहेर पडला ते त्यानेच पाहिले. तो कोणत्या ठिकाणी गेला आहे ? किती वाजता बाहेर पडणार आहे ? याची सर्व माहिती घेतल्यानंतर त्याने यल्ल्याला कळविले.

यल्ल्याने आपल्या साथीदारांना एकत्र करून शस्त्राची जमवाजमव केली. साडेदहा वाजताच ते मंगला थिएटरजवळ दाखल झाले. म्हस्के बाहेर पडून दुचाकीवर निघाला असताना रस्त्यात गाठून त्याच्यावर सर्वांनी शस्त्राने आणि दगडाने हल्ला केला. तब्बल सोळा ते सतरा वार त्याच्या मानेवर, तोंडावर आणि डोक्यात करण्यात आले होते. त्यामध्ये म्हस्केचा जागीच मृत्यू झाला. तेथून आरोपी विविध मार्गांनी हडपसर येथे पोहचून फरार झाले होते.

म्हणून म्हस्केची आठवण होत असे

म्हस्केने केलेल्या मारहाणीत यल्ल्याच्या तोंडाला आणि जबड्याला गंभीर इजा झाली होती. त्याच्या तोंडात प्लेट आणि जाळी बसविण्यात आली होती. रोज जेवताना यल्ल्याला त्रास होत होता. त्याला द्रव स्वरूपातच अन्न घ्यावे लागत होते. त्यामुळे म्हस्केमुळेच आपली ही अवस्था झाली ही सल त्याच्या मनात होती. त्यामुळे एकदिवस म्हस्केचा काटा काढायचा असे त्याने ठरवले होते. त्यातच म्हस्के हा गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर यल्ल्याला केस मागे घे म्हणून धमकावत होता. एवढेच नाही, तर त्याचा गेम करण्याची धमकी देत होता. त्याची भीती यल्ल्याला होती. त्यातूनच यल्ल्याने म्हस्केचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news