फक्त विकासकामे डोळ्यासमोर ठेवून सत्तेत सहभागी झालो ! आ. सुनील शेळके | पुढारी

फक्त विकासकामे डोळ्यासमोर ठेवून सत्तेत सहभागी झालो ! आ. सुनील शेळके

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : फक्त रखडलेली कामे पूर्ण व्हावीत व मावळच्या विकासासाठी आणखी निधी मिळावा, हाच उद्देश ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालो असल्याचे आ. सुनील शेळके यांनी स्पष्टीकरण दिले; तसेच सत्तेत गेल्यामुळे पावसाळी अधिवेशनात 39 कोटींचा निधी मिळाला असून आगामी वर्षभरात 400 ते 450 कोटींची कामे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आ. सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्तेत सहभागी झाल्यानंतर आ. शेळके यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन यामागचे कारण स्पष्ट केले व तालुक्यातील विकासकामांचा आढावा मांडला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, अतुल मराठे, नारायण मालपोटे उपस्थित होते.

सत्ता गेल्याने कामांना मिळाली होती स्थगिती

आमदार शेळके म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना मावळच्या विकासासाठी दोन वर्षात तब्बल 1 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला; परंतु गेले वर्षभर विरोधीपक्षात असल्यामुळे निधीतर मिळालाच नाही, उलट मंजूर असलेल्या कामांना स्थगिती मिळाली. त्यामुळे तालुक्यातील विकासकामे रखडू नयेत. उरलेल्या काळात आणखी निधी मिळवू, हा दृष्टिकोन ठेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

कान्हे उपजिल्हा रुग्णालयासाठी 9 कोटींचा निधी

पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यासाठी 9 कोटी व पाच प्रमुख रस्त्यांसाठी मिळून 39 कोटी, 62 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय 65 कोटी 59 लाख रुपये खर्चाच्या कामांवरील स्थगिती उठली आहे. तसेच महाविकास आघाडी काळात घोषणा केलेल्या लोणावळा टायगर पॉईंट येथील स्कायवॉक प्रकल्पासाठी 95 कोटी, जांभूळ येथील क्रीडा संकुलासाठी 15 कोटी, तळेगाव येथील नाट्यगृहासाठी 30 कोटी, वडेश्वर आदिवासी आश्रमशाळेसाठी 13 कोटी व डोणे-आढले उपसासिंचन योजनेसाठी 40 कोटी अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

पर्यटन विकासावर भर

लोणावळा येथील स्कायवॉक, एकवीरा देवी ते लोहगड रस्ता यांसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत असून, तालुक्यात येणार्‍या पर्यटकांना दळण-वळणाच्या दृष्टीने चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करून पर्यटन विकासाकडे लक्ष देणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

विकासासाठी एकत्र या

खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे व मी, आम्हा तिघांचे नेते अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सत्तेत आहेत. त्यामुळे तिघांनी हातात हात घालून फक्त मावळचा विकास हा दृष्टिकोन ठेवला तर तालुक्याच्या विकासाला मदतच होईल. तसेच केंद्र व राज्य शासनाशी निगडित असलेले कल्हाट, पवळेवाडी इको सेन्सेटिव्हचा प्रश्न, पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन, पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाटा, कान्हे फाटा, वडगाव फाटा, तळेगाव फाटा, सोमाटणे फाटा, देहूरोड या उड्डाण पुलांची कामे याशिवाय तळेगाव – चाकण रस्ता आदी प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे विकासासाठी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन केले.

हेही वाचा

हवेली तालुक्यात पावसाची प्रतीक्षा ; भाताची लागवड रखडली

चिखलीत वाढल्या गढूळ पाण्याच्या तक्रारी

भेंडा : आरोग्य मंदिराच्या पावित्र्याची जबाबदारी कोणाची?

Back to top button