हवेली तालुक्यात पावसाची प्रतीक्षा ; भाताची लागवड रखडली

हवेली तालुक्यात पावसाची प्रतीक्षा ; भाताची लागवड रखडली

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी पुरेसा पाऊस नसल्याने हवेली तालुक्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी 35 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील भाताची लागवड रखडली आहे. पाऊन न पडल्यास लागवड केलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सिंहगड भागातील डोणजे, खानापूर, खडकवासला, नांदोशीसह परिसरात पावसाने ओढ दिली आहे. हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले, तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली पाच हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 3 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 1 हजार 300 हेक्टर क्षेत्र पावसाअभावी पडून आहे. सर्वाधिक 2 हजार 210 हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. आतापर्यंत 1 हजार 710 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. 500 हेक्टर भातशेती पावसाअभावी पडून आहे.

तालुक्यात बाजरीचे 900 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 500 हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांचे क्षेत्र जवळपास 2 हजार हेक्टर आहे. पावसाअभावी हवेली तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने भात, भुईमूग वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अपुर्‍या पावसामुळे शेतीत कोणते पीक घ्यायचे यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी खानापूर (ता. हवेली) चे माजी सरपंच शरद जावळकर यांनी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news