

भेंडा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रशस्त व सर्व सोयीने युक्त प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या इमारतीत कामकाज सुरू झाल्यानंतर कर्मचार्यांना जे अनुभवायला मिळतं ते पाहून सांगणारे व ऐकणार्यांचे मने उद्विगन होऊन या आरोग्यमंदिराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न पडतो.
15 दिवसांपूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. इमारतीच्या आत कर्मचार्यांनी लावलेली गुलाबाची बाग त्यातील सुमारे 10 ते 15 गुलाबाची झाडे काहींनी उपटून काढली. काहीजण तिथेच आपल्या चारचाकी पार्किंग करतात, तर काहीजण या जागेवर लघुशंका करतात, तसेच या इमारतीच्या आत फरशीवर शौचास बसतात.
या अगोदर इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वी व आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी काहींनी खिडक्यांच्या काचा फोडलेल्या होत्या. हे सर्व चित्र बघून ही वास्तु कुणासाठी? या आरोग्य मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांना नक्कीच पडतो. आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाहेरचे असल्याने निमुट पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.
ही भव्य इमारत असल्याने तिची स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी कामागारांची गरज असूनही येथे त्यांची कमतरता आहे. चार परिचर आवश्यक असताना दोनच परिचर असून, त्यात एक दिव्यांग आहे. सुरक्षा रक्षकाची तरतुद नसली तरी येथे अधुनमधुन ग्रामपंचायतीने ती व्यवस्था करणे महत्वाचे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात नियंत्रणासाठी व देखरेखीसाठी असणार्या रुग्ण कल्याण समिती, नियामक मंडळांची ही सर्व जबाबदारी असली तरी सध्या या समित्या कार्यरत नाहीत. परंतु, माजी सदस्यांनी एकदा दबदबा निर्माण केल्यास पुन्हा कुणाचीही येथे गैरप्रकार करण्याची हिम्मत होणार नाही.
आरोग्य केंद्र इमारतीच्या आत येताना शेजारील दोन्ही बाजुच्या दुकानांच्या ग्राहकांची व नागरिकांची वाहने रस्स्तातच अडथळा निर्माण करतात. रुग्ण व त्यांचे नातेवाईक आपली दुचाकी, चारचाकी वाहने रुग्णवाहिका, इतर रुग्णांस येण्यास अडचण होईल अशी लावतात. येथे शिस्त व नियम पाळण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणने आहे.
परिसरातील रुग्णांसाठी महत्वपूर्ण असणार्या या वास्तुचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक नेत्यांनी, संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष घालून गैरप्रकार करणार्यांना अटकाव करणे आवश्यक आहे.
-डॉ. दीपक डिंबर,
वैद्यकीय अधिकारी,
कुकाणा