Sharad Pawar : मणिपूर विषयावर केंद्र सरकार लक्ष देत नसेल तर देशासाठी चिंतेची बाब : खा. शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, बोलताना त्यांनी मणिपूर विषयावर मोठं भाष्य केले. ते म्हणाले सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा मणिपूरचा असून या राज्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नसेल तर देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. ईशान्य भारतातील राज्य इतर देशांच्या सीमेला लागून आहेत. तसेच मणिपूरच्या सीमेला देखील दुसरा देश आहे. त्यामुळे ज्या राज्यांच्या सीमा इतर देशांच्या सीमेला लागून आहेत, अशा राज्यांच्या यातना समजून घेणे आवश्यक आहे. असे पवार म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, आम्ही सर्व इंडिया आघाडीचे नेते मणिपूरचा मुद्दा उचलून धरत आहोत. तरी देशाचे पंतप्रधान मोदी यांची चर्चा करण्याची कसलीही तयारी नाही. मोदींनी दोन तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी भाषण केलं. मात्र त्या भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीची भूमिका घेणे आवश्यक होती ती घेतलेली नाही. तुमच्याकडे गेली नऊ वर्षे सत्ता आहे . काँग्रेसकडे तीस वर्ष सत्ता होती. नऊ वर्ष जनतेने तुमच्या हातात सत्ता देऊन तुम्ही काय दिवे लावले आहेत, अशी टीका पवारांनी केंद्र सरकारवर केली.
ठाण्यातील घटनेवर पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक रुग्णालयात ही घटना घडणे चिंताजनक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने अत्यंत कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, सरकार या पातळीवर गंभीर दिसत नाही. ठाण्यातील घटनेत ज्या नागरिकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
कुटुंबातील वडीलधारा म्हणून भेट
भाजपशी आमचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारुन आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करु नका, तसेच अजित पवार यांच्याशी झालेली भेट गुप्त नव्हती. कुटुंबातील वडीलधारा म्हणून मी त्यांची भेट घेतली होती, असे पवार म्हणाले.
हेही वाचा
जग फिरण्यासाठी 3 वर्षांचे क्रूझ बुकिंग!
नागपूर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘कुकडी’चे पाणी नांदणीत सोडा ; शेतकर्यांची आमदार राम शिंदे यांच्याकडे मागणी