जग फिरण्यासाठी 3 वर्षांचे क्रूझ बुकिंग! | पुढारी

जग फिरण्यासाठी 3 वर्षांचे क्रूझ बुकिंग!

लंडन : युरोपियन देशात सध्या महागाई आपल्या सर्वोच्च शिखरावर आहे. बर्‍याच ठिकाणी हाहाकार माजला आहे. उत्पन्नाचे स्तर वेगाने कमी होत आहेत. लोकांचे खिसेदेखील साहजिकच हलके होत आहेत. पण, काहीही झाले तरी काही लोकांचे छंद अजिबात थांबत नाहीत. अवघे जग फिरण्याचा वसा घेतलेल्या एका अशाच अवलियाने या वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपला फिरण्याचा छंदही जपण्यासाठी चक्क 3 वर्षांसाठी पूर्ण क्रूझ बुक केले आहे. आता येत्या 3 वर्षांत तो याच क्रूझमध्ये राहील आणि याच क्रूझमधून जगभर फिरेलसुद्धा!

‘डेली मेल’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये राहणार्‍या या अवलियाचे अ‍ॅडम असे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. महागाईवर मार्ग काढण्यासाठी सरकार करावर कर लादत आहे. व्याज दरात शक्य तितकी वाढ केली जात आहे. राहण्या-खाण्याचा खर्च वाढत चालला आहे. एकंदरीत लोकांचे जगणे कठीण होत चालले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अ‍ॅडमने तीन वर्षांसाठी क्रूझवर स्वत:ची सीट आरक्षित केली आहे. या बुकिंगनुसार, नोव्हेंबरमध्ये तो सर्वप्रथम इस्तंबूलच्या प्रवासाला सुरुवात करेल. शांघायपासून मोंटेगो बेपर्यंत अनेक ठिकाणांना तो पहिल्या 100 दिवसांत भेटी देणार आहे.

मिरे इंटरनॅशनलच्या एमव्ही लारा जहाजावर एका केबीनची किंमत प्रतिवर्ष 63 लाख रुपये इतकी असेल, असे अ‍ॅडम यावेळी म्हणाला, बि—टनमध्ये वर्षभर राहण्याचा खर्च यापेक्षा अधिक आहे. याच रकमेत मी जगातील सात आश्चर्ये देखील पाहू शकतो. मला प्रारंभी हा घोटाळा वाटला होता. पण, नंतर त्याची सत्यता पडताळून पाहिली आणि या क्रूझच्या माध्यमातून मी जगातील 382 प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देणार आहे, याचा त्याने पुढे उल्लेख केला. क्रूझच्या हायस्पीड इंटरनेटमुळे मला माझा व्यवसाय सांभाळता येईल आणि यामुळे सुट्टीदेखील घ्यावी लागणार नाही, असे तो शेवटी म्हणाला.

संबंधित बातम्या
Back to top button