बारामतीत पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न  | पुढारी

बारामतीत पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न 

राजेंद्र गलांडे

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील पाटस रस्त्यावरील कृष्ण पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला सोमवारी (दि.७) भर दुपारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तुलाचा धाक दाखवत ते पेट्रोलपंपावरील रक्कम बॅंकेत भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. परंतु त्यांनी निकराचा प्रतिकार केल्याने दोघा चोरट्यांना ही रोकड न घेताच तेथून पसार व्हावे लागले.
सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेतली. ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून शहराच्या दिशेने येत होते. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु शिंदे यांनी ही बॅग पोटाखाली दाबून ठेवली.
बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले. तरीही शिंदे यांनी आपली चिकाटी सोडली नाही. चोरट्यांना बॅग मिळू नये, यासाठी जीवाचे रान केले. या घटनेत चोरट्यांनी त्यांना जबर मारहाण केली. शिंदे हे त्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पाच ते सहा टाके पडले आहेत.
बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. यासंबंधी गुजर म्हणाले, हे काम माहितीतील व्यक्तिने केले असावे. बारामतीत भरदिवसा अशा घटना घडणे चिंतेची बाब आहे.सुदैवाने यात रक्कम चोरीला गेलेली नाही. परंतु आमचे व्यवस्थापक मयुर शिंदे हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचाराच्या कामात आम्ही सध्या आहोत.  दरम्यान बारामतीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्याला खबर देण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा

Back to top button