कोरोनामुळे विस्कळीत झालेली शिक्षणाची गाडी अखेर रुळावर! | पुढारी

कोरोनामुळे विस्कळीत झालेली शिक्षणाची गाडी अखेर रुळावर!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे विस्कळीत झालेले विविध पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, अकरावी, आयटीआय अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष तीन वर्षांनंतर सुरळीत सुरू झाले. अनेक अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू झाल्यामुळे आगामी सत्रांच्या परीक्षा वेळेत पूर्ण होऊन, निकालही मुदतीत जाहीर होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरळीत झाल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे.

पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, अकरावी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू झाल्या आहेत. सध्या प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, कॉलेज सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आर्किटेक्चर, बीएस्सी नर्सिंगसारख्या काही अभ्यासक्रमांचा अपवाद वगळता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबविण्यात येणार्‍या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेर्‍या पुढील 15 दिवसांत संपून सर्वच अभ्यासक्रमांचे कॉलेज एक सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

आयटीआय’चे 53 टक्के प्रवेश

व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) आयटीआय डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत दोन फेर्‍या पूर्ण झाल्या असून, 53 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश झाले आहेत. पुढील 15 ते 20 दिवसांत ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात राहणार आहे. येत्या एक सप्टेंबरपासून सर्व आयटीआय सुरू होतील, अशी माहिती ’डीव्हीईटी’चे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.

विद्यापीठातील शैक्षणिक विभाग 21 ऑगस्टपासून सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार असून, विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. बारावीचा निकाल लवकर प्रसिद्ध झाल्यामुळे संलग्न कला, वाणिज्य, विज्ञान स्वायत्त महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या अध्यापनाला सुरुवात झाली असून, इतर महाविद्यालयेही येत्या आठवड्यात सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग (पदवी, पदव्युत्तर पदवी), एमआर्च कॉलेज सोमवारपासून (दि. 7) सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे एमबीए, एमसीएचे वर्ग 15 ऑगस्टच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे.

इंजिनीअरिंग, डिप्लोमाचे वर्ग 17 ऑगस्टला

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत प्रवेश फेर्‍या सुरू आहेत. 17 ऑगस्टच्या आसपास डिप्लोमा अभ्यासक्रमांची कॉलेज सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षाही वेळेत पूर्ण होतील, असे सूतोवाच डीटीई संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिले आहेत.

अकरावीचे वर्ग सुरू : गेली अनेक वर्षे दिवाळीपर्यंत चालणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम टप्प्यात आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे 70 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश झाले असून, वर्ग सुरू झाले आहेत. यंदा 15 ऑगस्टपर्यंत ही महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल वेळेत लागल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाली.

हेही वाचा

व्हिएतनाममध्ये दिसले गुलाबी आकाश!

ब्रेकिंग : राहुल गांधींना पुन्‍हा खासदारकी बहाल

नागरिकांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण; राज्याच्या आरोग्य विभागाचा निर्णय

Back to top button