तांबड्या-पांढऱ्या रश्यासाठी मी पुन्हा येईन; सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरने पुणेकरांना दिला शब्द | पुढारी

तांबड्या-पांढऱ्या रश्यासाठी मी पुन्हा येईन; सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरने पुणेकरांना दिला शब्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मंद वार्‍याची झुळूक अन् आकाशातून बरसणार्‍या हलक्या सरी… इमारतीच्या उंचावरून दिसणारे पुण्याचे विहंगम दृश्य… जणू पुणेकरांना ‘24 के क्राफ्ट ब्रिज’मध्ये येण्यासाठी खुणवत होते. त्यात प्रख्यात सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरचे आगमन आणखीनच उत्साह वाढवून गेले. ‘कसं काय पुणेकर,’ असे म्हणत सईने उपस्थितांची मने जिंकली.

चाहत्यांशी थेट संवाद साधत तिने सांगितले, ‘मी पश्चिम महाराष्ट्रातीलच असून, या रेस्टॉरंटची फूड क्वालिटी मला माहीत आहे. मी तांबडा-पांढरा रस्सा खायला पुन: पुन्हा येत राहणारच.’ पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर पुणे शहरातील ‘24 के क्राफ्ट ब्रिज’ हे रुफटॉप बिअर गार्डन अँड रेस्टॉरंट पुणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. या वेळी दैनिक ‘पुढारी’ समूहाचे चेअरमन आणि ग्रुप एडिटर डॉ. योगेश जाधव यांच्यासह ‘पुढारी’च्या संचालिका शीतल पाटील, रेस्टॉरंटचे सीईओ राजेश करंदीकर कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मराठी मालिकेतील संदीप जुवरकर, आतिश वैद्य, पायल जाधव, विठ्ठल काळे, स्वाती, तेजस बर्वे, गायक मंगेश बोरगावकर, संकेत मोरे या कलाकारांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. वेगळं काही अन् तेही भन्नाट… असं कोणी केलं, असे विचारले तर एक नाव प्रत्येकाच्या तोंडी निघते, ते म्हणजे पुणेकरांचं. आतापर्यंत ज्वारी, गहू, बाजरीपासून बिअर निर्मिती ऐकली होती.

मात्र, पुण्यात स्थायिक झालेल्या कोल्हापूरच्या एका तरुणाने चक्क आंबेमोहर तांदळापासून पोषक आणि वेगळ्या चवीची बिअर निर्मिती करून देशीविदेशी पर्यटकांना त्या बिअरची चव घेण्यास भाग पाडले आहे. देशातील पाचव्या अन् पुण्यातील तिसर्‍या 24 के क्राफ्ट ब्रिज रेस्टॉरंट-बारचा शनिवारी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते थाटात उद्घाटन सोहळा पार पडला.

सई म्हणाली, ‘मीदेखील चवीने खाणारी असून, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सर्वप्रथम किचन पाहते. रेस्टॉरंटमधील अन्नाची चवही शेफ यांच्या डोळ्यांतील भावनातून कळते. मी पुन्हा या रेस्टॉरंटमध्ये जरूर येणार आहे. कारण इथे तयार होणार्‍या प्रत्येक पदार्थांमध्ये पारंपरिक जुन्या पद्धतीने तयार केलेले मसाले मिसळले जातात. तांबडा आणि पांढरा रस्सा जरूर खायला येणार,’ असे म्हणत, ‘तुम्हीही याल ना!’ असे आवाहन करीत पुणेकरांकडून टाळ्या मिळवल्या.

सुरुवातीला राजेश करंदीकर यांनी सई ताम्हणकर यांचे, तर रेस्टॉरंटचे सीओओ सूरज लैगडे यांनी दैनिक ‘पुढारी’ समूहाचे चेअरमन आणि ग्रुप एडिटर योगेश जाधव यांचे स्वागत केले. या वेळी दोन्ही मान्यवरांच्या हस्ते अभय भिडे, स्वप्नील भिडे, तेजस काळे, योगेश पाटील, पॅव्हेलियन मॉलचे संचालक किंजल वाडिया, वास्तुविशारद अभिजित पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.

खवय्ये पुणेकरच देतील टाळ्या

रसिकांसह उपस्थित चाहत्यांशी संवाद साधताना सईने सांगितले, की पुण्यातील लोकांना टाळ्या वाजवायला सांगावे लागते. मात्र, पुणे शहरात सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये खवय्ये पुणेकरांनी चव घेतल्यावर आपोआप टाळ्या वाजवून दाद देतील. सोहळ्याचे संचालन करणार्‍या तरुणाने तिला बोलते करत प्रश्न केला, ‘तुला कोणते राईस खायला आवडतात.’ त्यावर तिने क्षणाचाही विचार न करता, ‘माझी आवड आंबेमोहर आहे, अन् राहील,’ हे आवर्जून सांगितले. ‘मी ऐकले की त्याच तांदळापासून बिअर बनवली आहे. माझ्या मते, बिअर गुड कंडिशनर आहे,’ असेही तिने पुणेकरांना टिप्स दिल्या.

गुणवत्तेत तडजोड नाही : डॉ. योगेश जाधव

मूळ कोल्हापूरचे असल्याने करंदीकर यांच्या रेस्टॉरंटच्या सर्व शाखा पाहिलेल्या आहेत. उत्तम गुणवत्ता अन् चव हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य आहे. माझ्या मते जे लोक फुडीज असतात, त्यांची सर्व भूक इथेच भागू शकते. म्हणून एकदा आलेला पुणेकर पुन्हा पुन्हा येईलच, असे डॉ. योगेश जाधव म्हणाले.

हेही वाचा

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ई -प्रणालीद्वारे होणार पंचनामे : आयुक्त गमे

गुन्हेगारांचा घडा भरला..! नगरचे एसपी राकेश ओला ‘अ‍ॅक्शन मोडवर’

…अखेर सांगवी-पुणे एसटी बससेवा सुरू

Back to top button