गुन्हेगारांचा घडा भरला..! नगरचे एसपी राकेश ओला ‘अ‍ॅक्शन मोडवर’ | पुढारी

गुन्हेगारांचा घडा भरला..! नगरचे एसपी राकेश ओला ‘अ‍ॅक्शन मोडवर’

श्रीकांत राऊत

नगर : जिल्ह्यात शांतता नांदावी, येणार्‍या काळातील सणोत्सव निर्विघ्न पार पडावेत यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल आठ सराईत टोळ्या हद्दपार करण्यात आल्या, तर दीडशे गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविले आहेत. सात गुन्हेगारांना एमपीडीए आणि दोन सराईत टोळ्यांना ‘मोक्का’ लावून त्यांचा कारागृहातील मुक्काम ओला यांनी वाढविला आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी तडीपारी, एमपीडीए आणि मोक्का अशा गंभीर स्वरूपाच्या कारवाया गुन्हेगारांवर करण्यासाठी सुरुवात केली आहे. अवैध दारूविक्री, जुगार, मटका, बिंगो, खून, खुनाचा प्रयत्न, वाळू तस्करी, धार्मिक तेढ निर्माण करणे, गोळीबार, खंडणी वसुली आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुंडंगिरी करणार्‍यांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.

गुन्हेगारांविरुद्ध तयार होत असलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी राहाता कामा नये, यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. कोणत्या गुन्हेगारावर कोणत्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, याची माहिती पोलिस अधिकार्‍यांसह अंमलदारांना देण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर व सर्वच पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांची टीम गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या कामाला लागली आहे.

पाप्या शेख, कासार टोळीला ‘मोक्का
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असतानादेखील कुरापती काढून साथीदारांच्या मदतीने गुन्हे करणार्‍या श्रीरामपुरातील सलीम ऊर्फ पाप्या शेख टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव ‘एलसीबी’चे प्रमुख दिनेश आहेर यांनी तयार केला होता. नगर तालुक्यातील इंद्रजीत कासार टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या दोन्ही टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.

आठ टोळ्यांतील 22 आरोपी हद्दपार
गेल्या सहा महिन्यांत सराईत आठ टोळ्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हद्दपार केल्या आहेत. त्यात 22 गुन्हेगारांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील घायमुक्ते टोळीला जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. एमपीडीए अर्थात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस अधीक्षकांनी सात गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हद्दपार, मोक्का व इतर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. दोन टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. अशाच आणखी एका कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
                                                             – राकेश ओला, पोलिस अधीक्षक 

 

हेही वाचा :

नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले

Pune Metro : पुणेकरांचा नादच खुळा! चक्क हात दाखवून थांबवली मेट्रो; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Back to top button