…अखेर सांगवी-पुणे एसटी बससेवा सुरू | पुढारी

...अखेर सांगवी-पुणे एसटी बससेवा सुरू

लोणी भापकर(ता. बारामती) पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात पुणे ते सांगवी बंद केलेली बससेवा सुरू करण्यासाठी वाकी, चोपडज ग्रामस्थांनी केलेला पाठपुरावा आणि दै. ‘पुढारी’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातमीला यश आले आहे. अखेर याबाबतची दखल घेत एसटी महामंडळाने पुणे ते सांगवी ही बससेवा सुरू केली. ही बससेवा सुरू झाल्यामुळे या मार्गावरील गावांतील ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक गावांच्या एसटी बससेवा बंद करण्यात आल्या होत्या. पुढे कोरोनाची साथ संपुष्टात आल्यानंतरही त्या बससेवा सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे खेडोपाडी राहणार्‍या सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. यापैकीच पुणे ते सांगवी ही कोळविहिरे, जोगवडी, मुर्टी, मोराळवाडी, कानाडवाडी, पळशी, वाकी, चोपडज या मोठ्या दाट लोकवस्तीच्या व आडमार्गी असणार्‍या गावांची बससेवादेखील एसटी मंडळाकडून बंदच होती.

ही बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची बातमी दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत अखेर एसटी महामंडळाने पुणे-सांगवी ही बससेवा पूर्ववत केली. याबाबत ग्रामस्थांनी बारामती आगार व्यवस्थापक व एमआयडीसी आगार व्यवस्थापक, तसेच दै. ‘पुढारी’चे आभार मानले.

दरम्यान, पांढरवस्ती येथे स्थानकप्रमुख दत्तात्रय भोसले, सांगवी-पुणे एसटीचे चालक विजयकुमार वाघ, वाहक सचिन लोणकर यांचा सत्कार करण्यात आला. वाकीचे सरपंच किसन बोडरे, उपसरपंच हनुमंत जगताप, चोपडजचे उपसरपंच तुकाराम भंडलकर, समीर गाडेकर, संतोष भोसले, किसनराव जगताप, संभाजी खलाटे, संदीप गाडेकर, नवनाथ वत्रे, प्रमोद गाडेकर, दिलीप गाडे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

रंकाळावेसमधील ‘गोल सर्कल’च्या गणेशमूर्तीचे जल्लोषात आगमन!

या गावाची अजब प्रथा ! चक्क 600 जावयांनीच गावकऱ्यांना दिले धोंड्याचे जेवण

कोरोनामुळे विस्कळीत झालेली शिक्षणाची गाडी अखेर रुळावर!

Back to top button