सातारा : दाट धुक्यात हरवलं पर्यटन डेस्टिनेशन; विकेंडमुळे महाबळेश्वरात गर्दी | पुढारी

सातारा : दाट धुक्यात हरवलं पर्यटन डेस्टिनेशन; विकेंडमुळे महाबळेश्वरात गर्दी

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या वर्षा पर्यटनाचा माहोल असून अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, दाट धुके व निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दाट धुक्यात महाबळेश्वर हरवलं असून पर्यटकांना साद घालू लागले आहे.

शनिवार-रविवार या विकेंडमुळे पर्यटकांची महाबळेश्वर येथे वर्दळ असून येथील धुंद वातावरणाने पर्यटक बेधुंद होत आहेत. धुक्यात हरवलेलं महाबळेश्वर पर्यटकांना खुणावत आहे. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांसाठी महाबळेश्वर हा बेस्ट ऑप्शन ठरत आहे. येथील विविध पॉईंट, पर्यटन स्थळे पाहून पर्यटक आनंदी दिसत असून केटस पॉईंट, धोम-बलकवडी धरण, वेण्णा लेकसह लिंगमळा धबधब्यावरील बेधुंद वातावरणाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत. लिंगमळा धबधबा तसेच वेण्णालेक नौकाविहार येथील दाट धुक्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत. वेण्णालेक येथे पर्यटक अधिक वेळ घालवताना दिसत आहेत. दाट धुक्यात अनेकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला. काही हौशी पर्यटक घोडेसवारी करताना दिसले.

महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. उबदार कपडे, शाल, मफलर सोबत इतर वस्तूंचीही खरेदी होत आहे. गरमागरम महाबळेश्वरी चणे, शेंगदाणे, मका कणीस, फ्रँकी स्प्रिंग पोटॅटो, मॅगीवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत.
दरम्यान संततधार पावसामुळे आजअखेर येथे 170 इंच पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button