फुरसुंगीकरांना स्वातंत्र्यदिनापर्यंत शुद्ध पाणी! | पुढारी

फुरसुंगीकरांना स्वातंत्र्यदिनापर्यंत शुद्ध पाणी!

फुरसुंगी(पुणे); कचरा डेपोबाधित फुरसुंगी व उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेची रविवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. सद्य:स्थितीत दोन्ही गावांतील जुन्या वितरण व्यवस्थेद्वारे हे पाणी देण्यात येणार असून, येत्या 15 ऑगस्टपर्यंत फुरसुंगीकरांना पिण्यासाठी नळाद्वारे शुद्ध पाणी मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. सकाळी सहाच्या सुमारास या योजनेचे पाणी गावात आल्याने फुरसुंगीकरांनी एकमेकांना पेढे भरवित आनंदोत्सव साजरा केला.

पुणे महापालिकेच्या कचरा डेपोमुळे फुरसुंगी व उरुळी देवाची या भागातील जलस्रोत दूषित झाले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने 2017 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 72 कोटी रुपयांची विशेष पाणीयोजना या गावांसाठी मंजूर केली होती. या योजनेसाठी पुणे लष्कर पाणीपुरवठा विभागातून पाणी आरक्षित करण्यात आले. मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी आणून तुकाई टेकडीवर जलशुद्धीकरण केंद्रात ते शुद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पाणी दोन्ही गावांत उभारण्यात येत असलेल्या 13 साठवण टाक्यांमध्ये सोडून नळांद्वारे घरोघरी पुरविण्यात येणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून या योजनेचे काम संथगतीने सुरू होते.

मध्यंतरी निधीअभावी या योजनेचे काम रखडल्याने राज्य सरकारमार्फत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. कचरा डेपोमुळे गेल्या 15 वर्षांपासून येथील रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेच्या टँकरवर अवलंबून आहे. 2017 साली ही योजना सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल, अशी येथील रहिवाशांना आशा होती; परंतु निधीच्या कमतरतेमुळे हे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले होते. रविवारी सकाळी गावात योजनेचे हे पाणी आल्यानंतर ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरविले. तसेच महिलांनी जलपूजन केले. या योजनेद्वारे लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी या वेळी रहिवाशांनी केले.

या पाणी योजनेची रविवारी सकाळी यशस्वी चाचणी करण्यात आली. सर्व अडथळे पार करत ही योजना पूर्णत्वास आली असून, ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या जलवितरण व्यवस्थेद्वारे येत्या 15 ऑगस्टपर्यंत फुरसुंगीकरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. येत्या काही दिवसांत राहिलेले सर्व काम पूर्ण करण्यात येईल.

-महादेव देवकर, उपअभियंता, महाराष्ट्र जल प्राधिकरण

फुरसुंगीकरांनी पाण्यासाठी इतके दिवस त्रास सहन केला आहे. मात्र, पाणी योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याने रहिवाशांचा पाणी प्रश्न लवकरच संपणार आहे. येत्या काही दिवसांतच गावात नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असल्याने रहिवाशांसाठी हा आनंदाचा उत्सव आहे.

-गणेश ढोरे, माजी नगरसेवक

हेही वाचा

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गास गती देऊ : खा. धनंजय महाडिक

राज्यातील मोफत आरोग्यसेवेचा गरजूंना होणार लाभ

वेल्हे : गिवशी येथे पावसामुळे दरड कोसळली

Back to top button