उरुळी कांचन : विद्युतीकरणाचा काडीमात्र उपयोग नाही | पुढारी

उरुळी कांचन : विद्युतीकरणाचा काडीमात्र उपयोग नाही

जयदीप जाधव

उरुळी कांचन(पुणे) : रेल्वेने दक्षिण व उत्तर भारताला जोडण्यासाठी मध्य रेल्वेचे पुणे शहर हे मोठे रेल्वे जंक्शन आहे. पुणे शहरातून अनेक महत्त्वाच्या रेल्वे पुणे ते दौंड मार्गाने मार्गस्थ होत आहेत. अशा वेळी पुणे ते दौंडदरम्यान लोकल रेल्वे सेवा उपलब्ध होणे गरज आहे. मात्र, या महत्त्वाच्या मागणीसाठी या भागातील लोकप्रतिनिधी शासनदरबारी प्रयत्न करत नाहीत. या भागातील मार्गाचे 6 वर्षांपूर्वी विद्युतीकरण होऊनही लोकप्रतिनिधींना प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी फारसा उत्साह नसल्याने लोकल सेवेची मागणी पडून आहे.

येथील प्रवाशांनी अनेक वेळा मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याकडे हा प्रश्न मांडला असला तरी त्याला सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. पुणे-दौंड रेल्वेमार्गावर दक्षिण भारत व उत्तर भारत देशातील प्रमुख शहरे रेल्वेने जोडली आहेत. या मार्गावरून नुकतीच वंदे भारत विशेष रेल्वेगाडी मुंबई ते सोलापूर दिशेने धावत आहे. यासह पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे-चैन्नई, कोयमतूर, हैद्राबाद, विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, कोची, हावडा, पटना आदी महत्त्वाचा रेल्वेगाड्यांचा हा मार्ग आहे.

या महत्त्वाच्या गाड्या पुणे सोडून थेट दौंड जंक्शनला थांबा घेत आहेत. यातील प्रमुख गाड्यांना जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या सणाला प्रयागधाम धर्मस्थळावर येणार्‍या भाविकांसाठी तात्पुरता रेल्वेचा थांबा मिळत आहे. परंतु, प्रवासी संख्या पाहता दक्षिणेकडे राज्याप्रमाणे अतिजलद गाड्यांचा उरुळी कांचनला थांबा मिळावा ही मागणी आहे.

कोरोना काळात महत्त्वाची भूमिका

कोरोना महामारीत जिल्हा प्रशासनाला उरुळी कांचन मार्गे रेल्वे उत्तर व दक्षिण भारतात सोडून या स्थानकाने प्रशासनास मोठे सहकार्य केले होते. अनेक परप्रांतीयांना या ठिकाणी सुरक्षित आपल्या भागात पाठविले होते. अशीच सुविधा लोकल रेल्वे सेवा व जलदगती गाड्यांचा थांबा मिळवून उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.

उरुळी कांचन भागातून वाढणारी प्रवासी संख्या विचारात घेता या ठिकाणी लोकल रेल्वे सेवा उपलब्ध होणे काळाची गरज आहे. शहराजवळील भागाला उपनगरीय सेवा देऊन उपनगरांचे कनेक्टिंग वाढविले आहे. पुणे विभागाने पुणे ते दौंड उपनगरीय सेवा उपलब्ध करण्याचे पाऊल उचलले पाहिजे. उरुळी कांचन व दौंड भागाकडे वाढणारे नागरीकरण पाहता ही सेवा रेल्वेने जलदगतीने उपलब्ध करावी.

– प्रकाश जगताप, रेल्वे प्रवासी संघ

हेही वाचा

नगर : झेडपीच्या 937 जागांची भरती सुरू

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नगर : उंबरेनंतर वांबोरीत लव्ह जिहाद

Back to top button