नगर : झेडपीच्या 937 जागांची भरती सुरू | पुढारी

नगर : झेडपीच्या 937 जागांची भरती सुरू

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ वर्गातील 937 रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून, शनिवारपासून (दि. 5) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीकडे तरुणांचे लक्ष लागले होते. सीईओ येरेकर तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी बिंदुनामावली मंजुरीपासून आवश्यक ती सर्व पूर्तता केली होती. त्यामुळे रिक्त जागांसाठी कधी जाहिरात सुटणार याकडेच उमेदवारांचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर शुक्रवारी (दि. 4) जाहिरात प्र्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा कालावधी
या पदांसाठी शनिवार, दि. 5 ते 25 ऑगस्ट या काळात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या सर्व जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्जासोबतच परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर होईल. परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उमेदवारांना ऑनलाईन प्राप्त होतील, असे येरेकर यांनी सांगितले.

परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी ः 1000 रुपये
मागास प्रवर्गासाठी ः 900 रुपये
अनाथ उमेदवारांसाठी ः 900 रुपये
माजी सैनिक, दिव्यांगांना शुल्क नाही

शुल्काबाबत नाराजी
अगोदरच नोकर्‍या नाहीत, हाताला काम नाही. तरुण नोकरभरतीकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी परीक्षा शुल्क म्हणून उमेदवारांकडून 900 ते 1000 रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांमधून याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. काही उमेदवार तर या संदर्भात न्यायालयात जाण्याचीही तयारी करीत असल्याचे समजते.

पद जागा
आरोग्यसेवक ः 22
आरोग्यसेवक फवारणी ः 187
आरोग्य परिचारिका ः 496
औषधनिर्माण अधिकारी ः 21
कंत्राटी ग्रामसेवक ः 52
कनिष्ठ अभियंता ः 32
कनिष्ठ अभियंता विद्युत ः 1
कनिष्ठ लेखाधिकारी ः 4
कनिष्ठ सहायक ः 13
कनिष्ठ सहायक लेखा ः 16
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका ः 6
पशुधन पर्यवेक्षक ः 42
वरिष्ठ सहायक लेखा ः 7
विस्तार अधिकारी सांख्यिकी ः 4
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ः 30
लघुलेखक ः 1
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ः 1

 

 

 

Back to top button