पुणे : पाणी साठणार्‍या ठिकाणांकडे पालिकेचे दुर्लक्ष | पुढारी

पुणे : पाणी साठणार्‍या ठिकाणांकडे पालिकेचे दुर्लक्ष

हिरा सरवदे

पुणे : महापालिका हद्दीत पाणी साचण्याची (वॉटर लॉगिंग) 135 ठिकाणे दुरुस्त करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी करूनही महापालिकेने केवळ 21 ठिकाणीच उपाययोजना केल्या. त्यामुळेपाणी साचणार्‍या ठिकाणांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून शहरात दरवर्षी पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती, ओढे व नाले, पावसाळी लाईन, चेंबर सफाई अशी विविध कामे केली जातात.

यंदाही या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांसह पथ, ड्रेनेज विभागाकडून निविदा राबवण्यात आली. पावसाळ्यामध्ये शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तपणे पाहणी करून पाणी साचण्याची ठिकाणे निश्चित केली जातात. या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेवर असते. गेल्या वर्षभरात जवळपास 200 पेक्षा अधिक पाणी साचणार्‍या ठिकाणी कामे करण्यात आली.

चालू वर्षी शहर व उपनगरांमध्ये पाणी साचण्याची 135 ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही, अशा उपाययोजना करण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी महापालिकेला केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने केवळ 21 ठिकाणांवरच उपाययोजना केल्याचे समोर आले आहे. उर्वरित 114 ठिकाणी उपाययोजना न केल्याने पाणी साचतच आहे. परिणामी, या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन शहरातील वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा महापालिकेला उर्वरित 114 ठिकाणी पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा

रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी नगरमध्ये दामिनी पथक

नगरमध्ये पुन्हा घुमला भोंग्याचा आवाज ; आठवणी जाग्या

नगर : मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा जेरबंद

Back to top button