नगरमध्ये पुन्हा घुमला भोंग्याचा आवाज ; आठवणी जाग्या

नगरमध्ये पुन्हा घुमला भोंग्याचा आवाज ; आठवणी जाग्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : ब्युरो म्युनिसिपालिटी असल्यापासून नगरकरांना दैनंदिन नित्यक्रमामध्ये भोंग्याची सेवा मिळत होती. पहाटे 5 व रात्री 8.30 वाजता भोंगा वाजत होता. स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नाने हा भोंगा पुन्हा सुरू झाला होता. परंतु, तांत्रिक अडचणींनी तो बंद झाला. आता सगळ्या अडचणी दूर करून भोंगा आज (दि.3) पासून नगरकरांच्या सेवेत रूजू झाला आहे.
एक मे 2013 रोजी जुन्या महापालिकेच्या कौन्सिल हॉलला आग लागली तेव्हापासून भोंगा बंद झाला होता. स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे महापालिकेचा ऐतिहासिक भोंगा महाराष्ट्रदिन व कामगारदिनाचे औचित्य साधून 1 मे 2023 रोजी नगरकरांच्या सेवेत दाखल झाला होता.

भोंगा तात्पुरत्या स्वरूपात संत कैकाडी महाराज व्यापारी संकुलावर बसविण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे तो पुन्हा बंद झाला. आता त्या भोंग्यासाठी पंधरा फुटांचा टॉवर उभा केला आहे. भोंग्याची मोटार दुरुस्त करून घेतली आहे. मोटारला कास्टिंग (बिड)चे मटेरिअल असल्याने वेल्डिंग होत नव्हते. ते वेल्डिंग करून आणले. भोंग्याला कायमस्वरूपी स्टँड बसविण्यात आले आहे. भोंग्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचार्‍याची नेमणूक केली आहे जुन्या महापालिकेजवळील संत कैकाडी महाराज व्यापारी संकुलावर बसविण्यात आलेल्या भोंग्याचा आवाज लालटाकी, जिल्हा रुग्णालय, कल्याण रोड, विनायकनगर, सारसनगर, झेंडी गेटपर्यंत ऐकू जातोे.

महापालिकेवरील भोंगा नगरकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला होता. मध्यंतरी बंद पडलेला भोंगा आता पहाटे पाच व रात्री साडेआठ वाजता वाजणार आहे. नगरकरांची आठवण पुन्हा नव्याने सुरू झाली याचा मनस्वी आनंद आहे. सावेडी उपनगरासाठीही भोंगा बसविण्याचा मानस आहे.
                                                 – गणेश कवडे, सभापती स्थायी समिती 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news