मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत आता मोफत उपचार मिळणार आहेत. या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे याबाबतची घोषणा करणार आहेत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजणार आहे. मात्र, हे अधिवेशन संपण्यापूर्वी शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतल्याचे समजते. राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमधील कलम 21 मध्ये भारतीय नागरिकांना 'जगण्याचा हक्क' हा मूलभूत अधिकार दिला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित आरोग्यसेवेचीही आवश्यकता असते. हाच आरोग्याचा हक्क शिंदे सरकार राज्यातील नागरिकांना देणार आहे.
यानुसार आता राज्यातील नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत मोफत उपचार मिळणार आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाचा हा प्रस्ताव मांडला. त्याला मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिल्याचे समजते. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल यासोबतच नाशिक आणि अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सर्व उपचार मोफत मिळणार आहेत. सद्य परिस्थितीमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी 55 लाख नागरिक या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत.
सीटीस्कॅन, सोनोग्राफीसह सर्व तपासण्या होणार मोफत
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सर्व ठिकाणी तपासण्याही मोफत होणार आहेत. त्यात रक्त चाचणी, सोनोग्राफी, सिटीस्कॅन आदी सर्व तपासण्या या मोफत केल्या जाणार आहेत. राज्यात 2 हजार 418 आरोग्य संस्था कार्यरत आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. राज्यात 'राईट टू हेल्थ'च्या दिशेने सरकारने टाकलेले हे पाऊल आहे.
मोठ्या रुग्णालयांत शुल्क आकारणार
हा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्र व रुग्णालयांसाठी आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत जेथे वैद्यकीय महाविद्यालये आहेत तेथे हा निर्णय लागू होणार नाही. त्यामुळे मुंबईतील जे. जे., सेंट जॉर्ज, पुण्यातील ससून अशी मोठी रुग्णालये या योजनेत नसतील. तेथे प्रचलित शुल्क द्यावेच लागेल.