पुणे विद्यापीठाला ऑगस्टमध्येच मिळणार प्र-कुलगुरू | पुढारी

पुणे विद्यापीठाला ऑगस्टमध्येच मिळणार प्र-कुलगुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड अंतिम टप्प्यात आली असून, ऑगस्ट महिन्यातच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यासाठी विद्यापीठातीलच अनेक प्राध्यापक शर्यतीत असून, त्यांच्यापैकीच एकाचे नाव कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी निश्चित करणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड झाल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत प्र-कुलगुरू निवडण्यात आले होते. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड होऊन तीन महिने होत आले, तरी अद्यापही विद्यापीठाला नवीन प्र-कुलगुरू मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्र-कुलगुरुपदासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह संलग्न महाविद्यालयातील काही प्राचार्य व उपप्राचार्य इच्छुक आहेत. विद्यापीठ कायद्यात झालेल्या सुधारणेनुसार विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने प्र-कुलगुरुपदावर पात्र उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कुलगुरूंबरोबरच प्र-कुलगुरूसुद्धा महत्त्वाचे आहेत. प्र-कुलगुरू नियुक्तीमुळे कुलगुरूंच्या कामाचा भारदेखील काही प्रमाणात हलका होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तरी प्र-कुलगुरुपदाचे नाव निश्चित होणार का? याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.

यापैकीच होणार एकाची निवड

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाच्या शर्यतीत डॉ. विजय खरे, डॉ. पराग काळकर, डॉ. महेश आबाळे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. अशोक चासकर, डॉ. संजय चाकणे आदी प्र-कुलगुरुपदाच्या शर्यतीत आहेत. यापैकी एकाचे नाव कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी प्र-कुलगुरुपदासाठी प्रस्तावित करतील आणि व्यवस्थापन परिषद त्याला मान्यता देणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणार्‍या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, या महिन्यात व्यवस्थापन परिषदेची बैठक कधी होणार? याची तारीख अंतिम झाली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

नगर : चोरीच्या दुचाकी विकणारे दोघे ताब्यात

बाप म्हणून कर्तव्य पार न पडल्याने मुलाने केला गोळीबार

पुणे : मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

Back to top button