पुणे-सोलापूर रस्त्यावरील पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधनाची चोरी | पुढारी

पुणे-सोलापूर रस्त्यावरील पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधनाची चोरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न करणार्‍या इंधनमाफिया प्रवीण मडीखांबे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. लोणी काळभोर परिसरातील बड्या इंधनमाफियाला अटक केल्याने इंधन चोरी प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय 51, रा. संतोषी बिल्डिंग, संभाजीनगर, लोणी काळभोर) याच्यासह विशाल धनाजी धायगुडे (वय 31), बाळू अरुण चौरे (वय 30, दोघे रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईहून सातारा, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तेल डेपोंना भूमिगत वाहिनीतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. पुणे-सोलापूर महामार्गावरील आळंदी म्हातोबाची परिसरातील डोंगरात 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस झाले होते. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय 32) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी इंधनमाफिया प्रवीण मडीखांबे आणि साथीदारांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

इंधन चोरीचे काळे साम्राज्य

आळंदी म्हातोबाची येथील भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण मडीखांबे याच्यावर यापूर्वी इंधन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. प्रवीण आणि साथीदार गेल्या दहा ते बारा वर्षांपासून लोणी काळभोर परिसरात इंधन चोरीते गुन्हे करत आहेत.

हेही वाचा

सिंहगड परिसरातील कातकरी समाजाला जातीचे दाखले

वाघोली : हद्दीच्या वादात नाल्यांचे काम अर्धवट; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Back to top button