सिंहगड परिसरातील कातकरी समाजाला जातीचे दाखले | पुढारी

सिंहगड परिसरातील कातकरी समाजाला जातीचे दाखले

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या डोंगर दर्‍याखोर्‍यात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीचे दाखले मिळाले आहेत. गोर्‍हे बुद्रुक येथे बुधवारी (दि. 2) आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहात 240 जणांना जातीच्या दाखल्यांचे वाटप हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्या हस्ते करण्यात आले.

जातीचे दाखले नसल्याने शासनाच्या योजनांपासून आदिवासी कातकरी समाज वर्षानुवर्षे वंचित आहे. याची दखल महसूल विभाग व घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्पाने घेतली. सिंहगड, पश्चिम हवेलीतील वरदाडे, मालखेड, वसवेवाडी, डोणजे, खडकवासला, कुडजे, गोर्‍हे, खानापूर,घेरा आदी ठिकाणच्या कातकरी वाड्या, पाड्यातील महिला, विद्यार्थी, तरुणांना दाखले देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली.

या वेळी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, खडकवासलाचे मंडळ अधिकारी हिंदुराव पोळ, दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पारगे, तलाठी उमेश देवगडे, सुशांत खिरीड, आदिवासी कार्यकर्त्या निरा वाघमारे, सुजित तिपोळे, कालिदास माताळे, अनंता पंडित आदी उपस्थित होते. दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पारगे म्हणाले, ‘कातकरी समाज अनेक वर्षांपासून गावकुसाबाहेर आहे. कष्टाची कामे,मजुरी, मासेमारीवर उदरनिर्वाह करीत आहे. जातीचे दाखले मिळाल्याने उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.’

तालुक्यातील सिंहगड, खडकवासला, पानशेत भागातील 240 आदिवासी कातकरी बांधवांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जातीचे दाखले देण्यात आले आहेत. कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– किरण सुरवसे,
तहसीलदार, हवेली.

हेही वाचा

लग्न झाल्यापासून विभक्त; घटस्फोटाला त्वरित मंजुरी

जातीनिहाय जनगणनेला चालना

काळजी घ्या, ‘आय फ्लू’चे रुग्ण वाढताहेत; पुण्यात हजारांहुन अधिक रुग्ण

Back to top button