चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा | पुढारी

चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांना कडक आदेश दिले असून चायनीज मांजा वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पर्यावरणमंत्री गोपाळ रॉय यांनी सांगितले की, नागरिकांनी चायनीज मांजाचा वापर करू नये. कोणी मांजाचा वापर अथवा विक्री करताना सापडल्यास शिक्षा आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. दिल्लीत 2017 पासून चायनीज मांजा वापरण्यावर बंदी आहे, तरीही चायनीज मांजा वापरताना सापडल्यास त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
चिनी मांजा सुताऐवजी रासायनिक पदार्थांपासून तयार केला जातो, असे मंत्री रॉय यांनी सांगितले.

अनेक जीवघेण्या घटना घडल्या

15 ऑगस्टच्या दरम्यान दिल्लीकरांना पतंग उडवणे खूपच आवडते. पतंग उडवत असताना दरवर्षी चायनीज मांजामुळे अनेकांचा जीव गेल्याच्या दुर्घटना समोर येतात. विशेषतः जनावरे आणि पक्षी मांजामध्ये अडकतात. तसेच रस्ता पार करत असताना अनेकांना मांजाचा फास बसल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे मंत्री रॉय यांनी नमूद केले.

Back to top button