वाघोली : हद्दीच्या वादात नाल्यांचे काम अर्धवट; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर | पुढारी

वाघोली : हद्दीच्या वादात नाल्यांचे काम अर्धवट; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

वाघोली(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. सा.बां. विभाग व पीएमआरडीएच्या हद्दीच्या वादामुळे पावसाळी नाल्यांचे काम पूर्ण झाले नाही. पर्यायाने नगर रोडवरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत स्टॉर्म वॉटर लाईनचे काम करण्यात आले. लाईफ लाईनपासून पुढे सा.बां. विभागाची हद्द सुरू होते. त्यामुळे सा.बां. विभागाने त्यानंतरचे काम बकोरी फाट्यापर्यंत केले. मात्र, दोन्ही विभागांकडून काम अर्धवट करण्यात आले. दोन्ही विभागांनी हद्दीचा वाद पुढे करून पावसाळी नाल्यांचे काम अर्धवटच केले आहे.

पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणासह पदपथ व पावसाळी नाल्यांचे काम करण्यात आले. पावसाळी नाले कचर्‍यांनी भरले असून, पादचारी मार्गाची अवस्थासुद्धा दयनीय झाली आहे. ठेकेदाराचा पाच वर्षांचा कालावधी येत्या चार-पाच महिन्यांत संपणार आहे. काम अर्धवट असताना तसेच चार वर्षांपासून मेंटेनन्स केलेला नसतानासुद्धा संबंधित विभागाने ठेकेदाराला बिल कसे काढले असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पीएमआरडीएकडून अकराशे मीटर स्टॉर्म वॉटर लाईन करण्यात आली होती. त्या लाईनला ग्रामपंचायतीने ड्रेनेजची लाईन जोडली असा अहवाल मिळाला आहे. चेंबर एका ठिकाणी खचले आहे, ती आमची जबाबदारी आहे त्यामुळे ते दुरुस्त केले जाईल. ड्रेनेजचे पाणी सोडले असेल, तर स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपाची असेल.

– विजय कांडगावे,
कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

केसनंद फाट्यावर असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ सांडपाणी ड्रेनेज लाईनला जोडले गेले नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईनपर्यंत पीएमआरडीएच्या अखत्यारित असल्याने पीएमआरडीएने देखभाल करणे गरजेचे आहे.

– राहुल कदम,
उप अभियंता, सा.बां. विभाग.

हेही वाचा

सिंहगड परिसरातील कातकरी समाजाला जातीचे दाखले

जावयाला अंगठी, चेन; तर मुलीला पैंजण अन् जोडवी

चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Back to top button