जावयाला अंगठी, चेन; तर मुलीला पैंजण अन् जोडवी | पुढारी

जावयाला अंगठी, चेन; तर मुलीला पैंजण अन् जोडवी

पुणे : अधिक महिना म्हटला तर जावयाचा यथायोग्य पाहुणचार आलाच. घरी आलेल्या जावयाला धोंड्याचे जेवण खाऊ घालत 33 अनारसे देण्यासह आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचे ताट, ताम्हण, निरांजन किंवा दागिना देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारात जावयासाठी सोन्याच्या, तर मुलीसाठी चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

दर तीन वर्षांनी मराठी पंचांगानुसार एकदा अधिक महिना येतो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. सण-उत्सव लांबणीवर पडले असले, तरी धोंड्याचा महिना सुरू असून, लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून मुलगी व जावयाला सासरवाडीहून आमंत्रण मिळत आहे. घरी आलेल्या जावयाला भेटवस्तू देण्यासाठी सराफा बाजारात सोन्याची अंगठी तसेच चेनला मोठी मागणी आहे. तर, लाडक्या लेकीसाठी पैंजण, जोडवी खरेदी करताना पुणेकर दिसून येत आहे.

अनारशांना मोठी मागणी

शहरात बहुतांश घरी अनारसे तयार करण्यात येत आहे. नागरिक रेडीमेड अनारसे खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. साजूक तुपातील 33 अनारसे 600 रुपये, तर साध्या तुपातील 33 अनारसे 300 रुपयांना उपलब्ध आहेत.

जावईबापूंना भेट देण्यासाठी चांदीचे ताट, ताम्हण, जोडवी, निरांजन यांसह इतर वस्तूंना मागणी वाढली आहे. सोन्याच्या प्रतितोळ्याचा भाव 56 हजार 700 रुपये, तर चांदीचा भाव 75 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. आर्थिक परिस्थितीनुसार सोन्या-चांदीच्या वस्तूंची पुणेकर खरेदी करीत आहेत.

– दत्तात्रय देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स

हेही वाचा

लग्न झाल्यापासून विभक्त; घटस्फोटाला त्वरित मंजुरी

पुणे विद्यापीठाचे सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार

पुणे : खासगी कंपन्यांचा बेरोजगारांना आधार

Back to top button