पुणे विद्यापीठाचे सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार

पुणे विद्यापीठाचे सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षांचे निकाल येत्या 15 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. तर, सध्या सुरू असलेल्या 22 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल येत्या सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रवेश उशिरा झाले. त्यामुळे अभ्यासक्रम उशिरा पूर्ण झाला आणि परीक्षा देखील यंदा उशिरा झाल्या. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला आहे. त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठदेखील अपवाद नाही. अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आदी 22 अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू आहे. 22 अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत, त्या परीक्षांचे निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहेत.

पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळातील अधिकारी प्रचंड मेहनत करीत आहेत. त्यामुळेच 139 पैकी जवळपास 104 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाविद्यालयांच्या चुकांमुळे काही निकालांमध्ये त्रुटी राहिल्या, तर त्यादेखील दुरुस्त केल्या जाणार आहेत. येत्या 15 ऑगस्टपर्यंत परीक्षा झालेल्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होतील. तसेच सध्या सुरू असलेल्या परीक्षांचे निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news