पुणे : खासगी कंपन्यांचा बेरोजगारांना आधार | पुढारी

पुणे : खासगी कंपन्यांचा बेरोजगारांना आधार

शिवाजी शिंदे

पुणे : नोकरी मिळत नाही, असे होत नाही. त्यासाठी प्रयत्नापेक्षा रोजगार मेळावे कोठे होत आहेत का, याकडे युवक-युवतींचे लक्ष पाहिजे. अशीच संधी राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने दिली आणि पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे एक ते सव्वा लाख बेरोजगारांना गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली. त्यांना शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर 15 ते 25 हजारांच्या आसपास खासगी कंपन्यांमध्ये वेतन मिळू लागले आहे. विशेष म्हणजे मेळाव्याचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातील बेरोजगारांनी घेतला असून, दीड वर्षात 62 हजार 750 जणांनी प्रत्यक्षात नोकरीचा लाभ घेतला आहे.

राज्याच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध खासगी कंपन्यांमध्ये नोकर्‍या देण्यासाठी वर्षभर रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. या मेळाव्यात युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात येते. त्यानुसार पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत असलेल्या या विभागाच्या कार्यालयाच्या वतीने मेळावे होत असतात.

शासकीय नियमानुसार वर्षातून प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा ते बारा मेळावे घेतलेच पाहिजेत, असा दंडक आहे. त्यानुसार काही प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन पद्धतीने मेळावे होत असतात. या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक- युवती कसे सहभागी होतील यावर भर देण्यात येतो. पुणे विभागांतील पाच जिल्ह्यांत गेल्या दीड वर्षात अनेक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यांना बेरोजगार युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात 1 लाख 15 हजाराहून अधिक जणांना विविध खासगी कंपनीत नोकर्‍या मिळाल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

पाचही जिल्ह्यांत सर्वात अधिक नोकर्‍या पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळाल्या आहेत. त्यांनी या मेळाव्याचा चांगलाच लाभ घेतला असल्याचे दिसून आले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी कमी लाभ घेतला असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. बेरोजगार युवक-युवतींना या मेळाव्याचा लाभ घेतला तर त्यांना नक्कीच खासगी कंपनीत नोकरींची संधी मिळू शकते.

  • जसे शिक्षण आणि अनुभव त्यानुसार वाढताहेत नोकरी आणि पगाराच्या संधी
  • किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळतेच
  • खासगी कंपन्यांत चांगल्या वेतनाच्या नोकर्‍या
  • कौशल्य विकास व रोजगर उद्योजकता विभागाची कामगिरी
  • या विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात वर्षभरात किमान दहा ते बारा रोजगार मेळावे

बेरोजगार तरुण आणि तरुणींनी खासगी कंपन्यांमधील नोकरीकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. पहिल्या टप्प्यात छोटी असलेली संधी भविष्यात मोठ्या पदावर देखील नेऊ शकते. खासगी कंपनीमधील नोकरीत नियमानुसार किमान वेतन मिळतेच. ही बाब लक्षात घेऊन तरुणांनी मानसिकता बदलली तर प्रगती निश्चितच होते.

अनुपमा पवार, उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार विभाग, पुणे विभाग

हेही वाचा

बडोदावालाने दिले बॉम्बनिर्मितीचे प्रशिक्षण; सासवडच्या जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी

छत्रपती संभाजीनगर : दोन बायका, पाच अपत्य तरीही कराटे शिक्षकाचा तरुणीसोबत घरोबा, बलात्काराचा गुन्हा नोंद

संभाजी भिडेंच्या चिपळूण सभेला परवानगी नाकारली

Back to top button